बुलडाणा : विविध प्राथमिक आराेग्य केंद्रांत नियुक्त करण्यात आलेल्या बीएएमएस वैद्यकीय अधिकाऱ्यांची सेवा कायम ठेवण्याची मागणी बीएएमएस गट ‘अ’ तदर्थ, कंत्राटी वैद्यकीय अधिकारी राज्यस्तरीय संघटनेच्या वतीने राज्याचे आराेग्यमंत्री राजेश टाेपे यांना निवेदन देऊन करण्यात आली हाेती़ या निवेदनाची दखल घेत ना़ टाेपे यांनी बीएएमएस वैद्यकीय अधिकाऱ्यांची सेवा समाप्त न करता काेविड सेंटरमध्ये नियुक्ती करण्याचे आदेश दिले आहेत़
एमबीबीएस अर्हताधारक उमेदवार मिळत नसल्याने अशा ठिकाणी (गट-अ पदावर) बी.ए.एम.एस. अर्हताधारक डॉक्टरांमधून कंत्राटी पद्धतीने वैद्यकीय अधिकारी पदे भरण्यास शासनाने परवानगी दिली हाेती़ त्यानंतर जिल्ह्यातील प्राथमिक आराेग्य केंद्रामध्ये बीएएमएस अर्हता धारकांची वैद्यकीय अधिकारी गट अ पदावर नियुक्ती करण्यात आली हाेती़ आता एमबीबीएस बंधपत्रित उमेदवार मिळत असल्याने बीएएमएस वैद्यकीय अधिकाऱ्यांची सेवा समाप्त करण्यात येत आहे़ त्यामुळे बीएएमएस गट ‘अ’ तदर्थ, कंत्राटी वैद्यकीय अधिकारी राज्यस्तरीय संघटनेच्या वतीने १५ मे राेजी आराेग्यमंत्री राजेश टाेपे यांना निवेदन देण्यात आले़ या निवेदनाची दखल घेत आराेग्यमंत्र्यांनी बीएएमएस वैद्यकीय अधिकाऱ्यांची सेवा खंडित न करता त्यांची काेविड सेंटरमध्ये नियुक्ती करण्याचे आदेश दिले आहेत़ बीएएमएस गट ‘अ’ तदर्थ, कंत्राटी वैद्यकीय अधिकारी राज्यस्तरीय संघटनेच्या वतीने प्राथमिक आराेग्य केंद्रांमध्येच वैद्यकीय अधिकारी गट अ पदावर नियुक्ती देण्याची मागणी करण्यात आली हाेती़ मात्र, ही मागणी मान्य करण्यात न आल्याने बीएएमएस डाॅक्टरांनी नाराजी व्यक्त केली आहे़