डोणगाव -
बेलगाव तालुका मेहकर येथील पत्रकार दीपक देशमुख यांची दुचाकी अज्ञात चाेरट्यांनी ११ एप्रिल राेजी लंपास केली़ ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली़ तरीही पाेलिसांना अजूनही चाेरट्यांचा शाेध घेता आलेला नाही़ गत काही दिवसांपासून परिसरात दुचाकी चाेरीच्या घटना वाढल्या आहेत़ पाेलिसांनी दुचाकी चाेरट्यांचा बंदाेबस्त करण्याची मागणी हाेत आहे़
धुळीमुळे पिकांचे नुकसान
धाड : परिसरात गत काही दिवसापासून रस्त्याचे काम सुरू आहे. या रस्त्यावर अवजड वाहने जात असल्याने धुळीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. ही धूळ रस्त्यालगत असलेल्या शेतातील पिकांवर बसत असल्याने पिकांचे माेठ्या प्रमाणात नुकसान हाेत आहे.
काेराेनाविषयक नियमांचे उल्लंघन
अमडापूर : परिसरात गत काही दिवसापासून काेराेना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. मात्र, ग्रामस्थांमध्ये काेराेना विषयी गांभीर्यच नसल्याचे चित्र असून नियमांचे उल्लंघन हाेत आहे.
वीज देयकांची सक्तीने वसुली, ग्राहक त्रस्त
किनगाव राजा : परिसरात गत काही दिवसापासून महावितरण कंपनीच्या वतीने लाॅकडाऊनच्या काळातील थकीत असलेली वीज देयके वसूल करण्याची माेहीम सुरू आहे. माेठ्या प्रमाणात आलेली देयके भरण्यासाठी सर्वसामान्यांकडे आधीच पैसे नाहीत.
पांदण रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी
धामणगाव बढे : परिसरातील पांदण रस्त्याची गत काही दिवसापासून दयनीय अवस्था झाली आहे. अनेक शेतकऱ्यांना आपला शेतमाल घरी आणता येत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे, राेजगार हमी याेजनेतून पांदण रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
निमखेड येथे शेतकरी कार्यशाळा संपन्न
बुलडाणा : राष्ट्रीय शाश्वत अभियानांतर्गत जमीन आराेग्य पत्रिका सन २०२१ अंतर्गत निमखेड येथे शेतकरी मार्गदर्शन कार्यशाळा घेण्यात आली. अध्यक्षस्थानी शेषराव पाटील हाेते तर प्रमुख अतिथी म्हणून कृषी सहाय्यक बी.जी. गडबे, देशमुख आदी उपस्थित हाेते.
नुकसानग्रस्त शेतकरी मदतीपासून वंचित
देऊळगाव राजा : तालुक्यातील रोहणा, टाकरखेड परिसरात १८ फेब्रुवारी राेजी झालेल्या पावसामुळे हरभरा, गहू, शाळू, मका, कांदा व फळबागांसह पालेभाज्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अजूनही मदत मिळालेली नाही़
वीज जोडणी कापल्यास तीव्र आंदाेलन
किनगाव राजा : वीजबिल न भरणाऱ्या शेतकऱ्यांची व घरगुती वीज ग्राहकांची जोडणी तोडण्याचा निर्णय महावितरणने घेतला आहे. थकीत देयक असलेल्या ग्राहकांची वीज कापू नये तसेच अवाजवी देयके कमी करण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने करण्यात आली आहे़
स्वस्त धान्य निकृष्ट मिळत असल्याची तक्रार
बुलडाणा : स्वस्त धान्य दुकानांमधून वितरित करण्यात येणारा मका आणि ज्वारी निकृष्ट दर्जाची असल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली आहे़ सध्या लाॅकडाऊन सुरू असल्याने मजुरी करणाऱ्यांना स्वस्त धान्यांवरच आपली उपजीविका भागवावी लागत आहे़ याकडे वरिष्ठांनी लक्ष देण्याची मागणी हाेत आहे़
बेशिस्त वाहनांमुळे वाहतुकीस अडथळा
डाेणगाव : मुख्य रस्त्यावर वाहने अस्ताव्यस्त उभी करण्यात येत असल्याने वाहतुकीस अडथळा येत आहे. त्यामुळे, वाहनधारक कमालीचे त्रस्त झाले आहेत. बेशिस्तपणे वाहने उभी करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी हाेत आहे.
गॅस दरवाढ झाल्याने स्वयंपाक पुन्हा चुलीवर
बुलडाणा : गॅसच्या दरात माेठी वाढ हाेत असल्याने गृहिणी पुन्हा चुलीवर स्वयंपाक करीत असल्याचे चित्र धामणगाव धाड परिसरात आहे. उज्ज्वला याेजनेंतर्गत अनेकांना माेफत गॅस मिळाला असला तरी दरवाढ झाल्याने गॅस परवडत नसल्याचे चित्र आहे.
अभ्यासिका सुरू करण्याची मागणी
बुलडाणा : मागील काही दिवसापासून जिल्ह्यात शासनाने लॉकडाऊन सुरू केले आहे. या लॉकडाऊनमुळे स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी कोणतीच अभ्यासिका सुरू नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होत आहे.