पावसाच्या आगमणाने शेतकरी सुखावला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2021 04:24 AM2021-06-18T04:24:35+5:302021-06-18T04:24:35+5:30
यंदाच्या वर्षी खरीप हंगामाची सुरुवात सोयाबीन बियाण्याच्या कृत्रिम टंचाईच्या समस्येने झाली. त्यात खतांच्या दराची अचानक झालेली वाढ, नंतर शासनाच्या ...
यंदाच्या वर्षी खरीप हंगामाची सुरुवात सोयाबीन बियाण्याच्या कृत्रिम टंचाईच्या समस्येने झाली. त्यात खतांच्या दराची अचानक झालेली वाढ, नंतर शासनाच्या वतीने ही अतिरिक्त वाढ कमी होत नाही, तो बियाणे टंचाई निर्माण झाली. अशा परीस्थीतीचा सामना शेतकरी करत असताना पावसाचे आगमन रखडल्याने खरीपाची पेरणी लांबणीवर पडणार काय आणि पेरण्या लांबल्या तर शेतकऱ्यांचे नियोजन कोलमडून पडणार अशी विचित्र अवस्था शेतकऱ्यांची झाली होती. दरम्यान बुधवारी सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास आभाळात भराभर ढग जमा होऊन वातावरणात गारवा निर्माण झाला. वादळासह पावसाने हजेरी लावली. दोन तास हजेरी लावत शेतकऱ्यांमध्ये आनंद मिळाला. आता शिवारात पेरणी हंगामास निश्चितपणे सुरुवात होईल अशी परीस्थीती आहे. दरम्यान, शेतकऱ्यांनी शेतीची आंतरमशागत, बांधबंधीस्ती, जनावरांचे वैरणाचा भरणा, गोठा बांधणी आदी कामांना प्राधान्य दिले होते. खरीपाच्या पेरणीची तयारी या भागात शेतकऱ्यांनी केली असून केवळ पेरणीयोग्य पावसाची प्रतिक्षा या भागातील शेतकरी करत होते. पावसाच्या आगमनाने सर्वत्र समाधान व्यक्त होत असले तरीही अजूनही सुरुवातीला भरपूर प्रमाणात पाऊस होणे आवश्यक आहे. त्यामुळे पेरण्या प्रारंभ जरी होत असल्या तरी या भागात जोरदार पावसाची अपेक्षा शेतकरी करीत आहेत.