सिंदखेडराजा - लोणार तालुक्यातील साखरखेर्डा आणि शेंदुर्जन मंडळात ३० आॅगस्ट रोजी कृत्रिम पावसाचा प्रयोग यशस्वी झाला असून परिसरातील काही गावात गावात तब्बल एक तासाहून अधिक वेळ पाऊस बरसला. यामुळे पिकांना नवसंजीवनी मिळाली आहे. दरम्यान, लोणार तालुक्यातील ही आठ गावात हा कृत्रिम पाऊस पडल्याची चर्चा आहे. या भागातही विमानाने घिरट्या घातल्याचे नागरिकाचे म्हणणे आहे.सिंदखेडराजा आणि देऊळगावराजा तालूक्यात दरवर्षी पेक्षा अल्प पाऊस झाल्याने नदी , नाले , जलयुक्त शिवारातील बंधारे, तलाव, धरणे कोरडीच असून भविष्यात भीषण पाणीटंचाई निर्माण होऊ शकते. दुष्काळाचा सामना करतांना शेतकरी हतबल झाला आहे. जुन, जूलै महिन्यात केवळ रिमझीम पावसाच्या भरोशावर शेतकºयांनी पेरणी केली होती. त्यावर शेतीही बहरली. परंतू गेल्या एक महिन्यापासून पावसाने चांगलीच दडी मारली होती. आकाशात काळेकुट्ट ढग जमा होत होते. परंतू ते हवेच्या झोकात पुढे निघू जात होते. मराठवाड्यातकृत्रीम पाऊस पाडण्यासाठी औरंगाबाद येथे रडार बसविण्यात आले होते .मराठवाड्याला लागून असलेल्या सिंदखेड राजा, लोणार तालुक्यालाही दुष्काळाची झळ बसली आहे. या भागात वार्षिक सरासरीच्या तुलनेत अत्यंत कमी पाऊस पडला आहे. त्यामुळे या भागात कृत्रिम पाऊस पाडण्यात यावा, अशी मागणी जोर धरत होती. त्यासंदर्भाने आ. डॉ. शशिकांत खेडेकर यांनी कृषीमंत्री अनिल बोंडे यांच्याकडे मागणी केली होती. त्यासाठी त्यांची आ. डॉ. खेडकरांनी प्रत्यक्ष भेटही घेतली होती. ३० जुलै रोजी याबाबतचे पत्रही त्यांना सादर केले होते.दरम्यान, तालुक्यातील स्थिती बिकट बनत होती. अशा स्थितीत ३० आॅगस्ट रोजी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास सिंदखेड राजा तालुक्यातील साखरखेर्डा आणि शेंदुर्जन मंडळातील राताळी, शिंदी, पिंपळगाव सोनारा, दरेगाव, तांदुळवाडी, गोरेगाव, उमनगाव, काटेपांगरी, सावंगीभगत, गुंज, एकांबा, बाळसमुद्र , लिंगा, सायाळा, वडगावमाळी या गावशिवारात काळे ढग जमा झाले होते. त्याचवेळी आकाशात एक छोटे विमान घिरट्या घालत असल्याचे अनेक ग्रामस्थांच्या निदर्शनास आले आणि काही वेळातच परिसरात पाऊस सुरू झाला. त्यामुळे हा कृत्रिम पाऊस असल्याची चर्चा सुरू झाली. अनेक हौशींनी घिरट्या घालणाºया विमानाचे आपल्या मोबाईलमध्ये छायाचित्र व व्हीडीओही काढले आहेत. दरम्यान, परिसरात काही प्रमाणात पाऊस पडल्याचे सांगण्यात येत आहे.
साखरखेर्डा परिसरात कृत्रिम पाऊस बरसला! विमानानेही मारल्या घिरट्या
By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2019 9:02 PM