लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : शहरानजिक गावात आढळलेल्या मादी अजगराची १६ अंडी कृत्रिमपणे उबवून त्याद्वारे १६ पिल्लांना जन्म देण्याची जिल्ह्यातील पहिलीच घटना खामगावात घडली. मादीला आधीच तर जन्मलेल्या पिल्लांना नंतर जंगलात सुखरूप सोडण्यात आले आहे.पिंप्री गवळी येथील ग्रामस्थांना गावात १० फुटाचा अजगर २८ जून रोजी आढळला होता. त्यामुळे भितीचे वातावरण निर्माण झाले. याबाबतची माहिती मिळताच सर्पमित्र शैलेश तासतोडे गावात पोहचले. त्यावेळी मादी अजगर अंड्यांचे संरक्षण करीत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी वन्यजीव व सर्पअभ्यासक अतिश गवई यांना बोलावले व मादीला पकडून अंडी ताब्यात घेतली. त्यावर मार्कर पेनद्वारे मार्किंग करुन बिळातील तापमानाची माहिती घेतली. वनविभागाच्या परवानगीने अजगर मादीला जंगलामध्ये सुखरुप सोडण्यात आले. अंडी कृत्रिमरित्या उबविण्यासाठी गवई यांचे घरी आणण्यात आली. २८ जूनपासून दररोज त्या अंड्यांना मातीच्या रांजणात आवश्यक असलेली आर्द्रता व साधारणत: ३२ ते ३८ अंश सेल्सिअस तापमान नियंत्रित केले. २ जुलै रोजी १ महिन्यानंतर प्रयत्नांना यश आले. १६ अंड्यांतून चांगल्या स्थितीत अजगराच्या पिल्ले बाहेर आली, अशी माहिती अतिश गवई यांनी दिली. वन अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ही पिल्ले जंगलात सोडली.
अजगराची अंडी कृत्रिमरित्या उबवून १६ पिल्लांचा जन्म
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 05, 2020 11:18 AM