कलावंतांची मुले शिक्षणाच्या प्रवाहात
By admin | Published: May 25, 2015 02:27 AM2015-05-25T02:27:41+5:302015-05-25T02:27:41+5:30
लोकजागर परिवाराचा मदतीचा हात; ४२ मुलांच्या भवितव्यासाठी राजहंस परिवाराची धडपड.
अशोक इंगळे /सिंदखेडराजा (जि. बुलडाणा) : पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा भागात तमासगीर कलावंतांची संख्या जास्त. पोटाची खळगी भरण्यासाठी या गावावरून त्या गावावर आपलं बिर्हाड दररोज हलविणारा कलावंत हा स्वत:च्या मुलाचं शिक्षण कोठे चालू आहे, त्यांना शिक्षण मिळते का, शिक्षण घेताना इतर मुले त्यांना जवळ घेतात का, याची किंचितही कल्पना त्यांना नसते. ही बाब ओळखून येळंब जि. बीड येथील राजहंस परिवाराने ४२ कलावंतांच्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणले आहे. तमासगीर कलावंतांच्या मुलांचे भवितव्य घडविण्यासाठी राजहंस परिवाराची धडपड पाहून येथील लोकजागर परिवाराने मदतीचा हात पुढे केला आहे. तमासगीर कलावंत आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी या गावावरुन त्या गावावर जात असतात. त्यामुळे तमासगीर कलावंतांची मुले शिक्षणापासून वंचितच राहतात. त्यासाठी येळंब जि. बीड येथील सुरेश राजहंस व मयूरी राजहंस परिवाराने ४२ कलावंतांच्या मुलांना शिक्षणाची सोय केली आहे. त्यामुळे सायंदेव ता. सिंदखेडराजा येथे लोकजागर परिवाराच्यावतीने सुरेश व मयूरी राजहंस यांचा सन्मान करण्यात आला. सन्मान करताना वह्या, पुस्तके व रोख १३ हजार रुपयांची मदत त्यांना सुपूर्द करण्यात आली आहे. तमाशा कलावंतांशी संपर्क साधून मुलांच्या भवितव्याविषयी प्रश्न उपस्थित केला की अंगावर काटा उभा राहतो. तुमच्या मुलांचे भवितव्य आम्ही घडविणार, तुमची मुलं आमच्या पदरात घाला, अशी मायेची हाक राजहंस यांनी प्रत्येक फडावर जाऊन दिली. त्याला प्रतिसादही मिळाला. एक-एक करीत ४२ मुलं त्यांना मिळाली. शासनाची कोणतीही मदत मिळत नसताना हा भार लोकसहभागातून त्यांनी उचलला. एक खारीचा वाटा म्हणून लोकजागर परिवाराने त्यांना केली, असे मनोगत प्रवीण गीते यांनी मांडले. याहीपुढे अशा समाजसेवी कार्यात लोकजागर परिवार नेहमी सहभागी राहील, असेही त्यांनी सांगितले.