तोरणवाडा - मोहदरी रस्त्याचे मजबुतीकरणासह डांबरीकरण करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2021 04:42 AM2021-09-16T04:42:34+5:302021-09-16T04:42:34+5:30
अमडापूर : तोरणवाडा - मोहदरी रस्त्याचे मजबुतीकरणासह डांबरीकरण करून पुलाची उंची वाढवावी, अशी मागणी करणारे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले ...
अमडापूर : तोरणवाडा - मोहदरी रस्त्याचे मजबुतीकरणासह डांबरीकरण करून पुलाची उंची वाढवावी, अशी मागणी करणारे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहे.
चिखली तालुक्यातील तोरणवाडा - मोहदरी रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून, खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डे अशी परिस्थिती निर्माण झाल्यामुळे गावकऱ्यांसह वाहनधारकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो. या गावाला दैनंदिन व्यापार, व्यवहार, वैद्यकीय सुविधा, तसेच विद्यार्थी व विद्यार्थिनींना दळणवळणासाठी हा एकमेव मार्ग आहे. तोही गेल्या तीन-चार वर्षांपासून अतिशय खराब झाला आहे. त्यामुळे नेहमीच या रस्त्यावर अपघात होतात. गावाला लागून असलेल्या पुलाची उंची अतिशय कमी असल्यामुळे थोडा जरी पाऊस झाला तरी पुलावर पाणी येऊन वाहतूक विस्कळीत होते. या गावाला एकच मार्ग असल्याने या रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण करून पुलाची उंची वाढवावी, यासाठी तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष समाधान सुपेकर तसेच महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सचिव राम डहाके यांनी गावकऱ्यांसह जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेत निवेदन दिले. यावेळी नगरसेवक सचिन बोंद्रे, कृउबासचे संचालक पंजाबराव अंभोरे, ग्रामपंचायत सदस्य विठ्ठल राठोड, दगडू आराख, दीपक लहाने, प्रमोद टेकाळे, राजू तरळकर यांच्यासह बहुसंख्य ग्रामस्थ उपस्थित होते.