‘कल्लोळातला एकांत’ आणि ‘वर्तमानाचा वतनदार’ या तीन दर्जेदार सकस कवितासंग्रहातील पाच कवितांचा समावेश शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरच्या बी. ए.द्वितीय वर्षाच्या अभ्यासक्रमात यापूर्वीच करण्यात आलेला आहे, तर आता २०२१ च्या नवीन सत्रामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूरच्या बी. ए. भाग ३ च्या अभ्यासक्रमामध्ये ‘व्यवहाराचा काळा घोडा’ कविता संग्रहातील कवितांचा समावेश करण्यात आला असल्याने अजीम नवाज राही यांच्या वस्तुनिष्ठ शब्दसाधनेचा सोलापूर विद्यापीठाकडून सन्मान करण्यात आला आहे.
महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक मंडळाच्या इयत्ता १० वी व इयत्ता ११ वीच्या पाठ्यपुस्तकात कविता संग्रहाच्या समावेशानंतर अजीम नवाज राही यांच्या शब्दसंपदेने कोल्हापूर विद्यापीठापर्यंतचा प्रशंसनीय पल्ला गाठला होता; तर आता त्यांच्या व्यवहाराचा काळा घोडा या कविता संग्रहाचा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाने दखल घेऊन अख्खा कवितासंग्रह बी. ए. भाग ३ च्या अभ्यासक्रमात समावेश केला आहे. यापूर्वी त्यांच्या कविता संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद, संत तुकडोजी महाराज विद्यापीठ, नागपूर, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव, स्वामी रामानंदतीर्थ विद्यापीठ, नांदेड, मुंबई विद्यापीठ, मुंबई, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर व आता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर अशा महाराष्ट्रातील नऊ विद्यापीठांत अजीम नवाज राही यांच्या साहित्यसंपदेच्या समावेशाच्या माध्यमातून वैदर्भीय वाङ्मय परंपरेचा पर्यायाने बुलडाणा जिल्ह्याच्या साहित्य परंपरेचा आभाळउंचीचा सन्मान झाला आहे. महाराष्ट्राच्या नऊ विद्यापीठांत राहींच्या कवितांचा समावेश होणे हा तसा वाङ्मयीन विक्रमच. सोलापूर विद्यापीठाने व्यवहाराचा काळा घोड्याचं बी. ए.तृतीय वर्षात समावेश केल्याबद्दल सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू, मराठी विभागप्रमुख प्रा. शेख आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे राही यांनी आभार मानले आहे.
चर्चेतील कवी-
नव्वदोत्तरीनंतर मराठी कवितेत ज्या कवींची नावे ताकदीने पुढे आली, त्या नामावलीत अजीम नवाज राही यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. त्यांच्या कवितेत गावमातीत राबणाऱ्या परिघावरच्या कष्टकरी, सर्वहारा वर्गाच्या वस्तुनिष्ठ वेदना बोलक्या होतात. त्यांचा अख्खा शब्दप्रवाह आशयघन, वस्तुनिष्ठ अस्सल सल असलेला. जगणे व कवितेचे एकरूपत्व अधोरेखित करणारा म्हणावा लागेल. आतापर्यंत त्यांच्या व्यवहाराचा काळा घोडा, कल्लोळातला एकांत, वर्तमानाचा वतनदार त्यांच्या या तीन कवितासंग्रहांना आतापर्यंत साहित्य क्षेत्रातील ११ नामांकित पुरस्कार मिळालेले आहेत.