पीक कर्ज वाटपाचा टक्का वाढण्यात थकबाकीचा अडसर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2019 03:03 PM2019-07-14T15:03:38+5:302019-07-14T15:09:03+5:30
वनटाईम सेटलमेंट न केल्याने तथा कर्जमाफीनंतरच्या वर्षातील कर्ज थकित असल्याने शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप करण्यात अडचणी येत आहे.
- नीलेश जोशी
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : शेतकरी कर्ज माफी योजनेतंर्गत वनटाईम सेटलमेंट न केल्याने तथा कर्जमाफीनंतरच्या वर्षातील कर्ज थकित असल्याने शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप करण्यात अडचणी येत आहे. परिणामी पीक कर्ज वाटपाचा टक्का फारसा पुढे सरकला नसल्याचे वास्तव समोर आले आहे. दरम्यान, पात्र एक लाख १५ हजार ६४२ शेतकऱ्यांचा विचार करता प्रत्यक्षात बँकांनी १७.२० टक्के शेतकºयांना जुलै महिन्याच्या मध्यावर पीक कर्ज वाटप केल्याचे चित्र जिल्ह्यात आहे.
दरम्यान, बुलडाणा जिल्ह्यात तीन लाख ३३ हजार ९६५ शेतकºयांना चालू आर्थिक वर्षात एक हजार ७७३ कोटी ७७ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटपाचे उदिष्ट आहे. यापैकी १२ हजार ४९६ शेतकरी नियमित कर्ज भरणारे आहे तर ७१ हजार ३५१ शेतकरी पीक कर्ज पूनर्गठणासाठी पात्र आहेत तर चार हजार ६८४ शेतकºयांनी पीक कर्जाचे पूर्नगठण करण्यास होकार दिलेले आणि अन्य काही असे मिळून प्रत्यक्षात एक लाख १५ हजार शेतकरी हे नव्याने पीक कर्ज मिळण्यासाठी पात्र ठरलेले आहेत. अशा शेतकºयांपैकी १९ हजार ८९५ शेतकºयांना १६१ कोटी ८६ लाख २२ हजार रुपयांचे पीक कर्ज वाटप करण्यात आले आहे. त्याची टक्केवारी ही १७.२० टक्के येते. मात्र पीक कर्जाच्या उदिष्टाचा विचार करता ही टक्केवारी ९ टक्क्यांच्या आसपास असली तरी शेतकºयांकडे कर्जमाफी झाल्यानंतरच्या वर्षातील पीक कर्जाची रक्कम थकित असल्याने जवळपास एक लाख ११ हजार ८८५ शेतकºयांना पीक कर्ज वाटप करण्यात अडचणी येत आहेत. त्या सोबतच छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेनंतर्गत कर्जमाफी मिळाल्यानंतरही २५ हजार ६४१ शेतकºयांनी त्यांच्या कर्जाचे वनटाईम सेटलमेंट केलेले नाही. योजनेतंर्गत कर्जमाफी मिळाली मात्र त्याचा लाभ न घेतलेले ४७ हजार ९९९ शेतकरी जिल्ह्यात आहे. या सर्व शेतकºयांचा एकत्रीत विचार करता एक लाख ८५ हजार ५२५ शेतकºयांना पीक कर्ज वाटपात अडचणी निर्माण झाल्या आहेत.
बँक निहाय पीक कर्ज वाटपाचा टक्का पाहता सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी दहा हजार २०३ शेतकºयांना ७८ कोटी ९६ लाख रुपयांचे, खासगी अर्थात व्यापारी बँकांनी दोन हजार २२४ शेतकºयांना ३६ कोटी २५ लाख ४६ हजार रुपयांचे पीक कर्ज वाटप केलेले आहे. विदर्भ कोकण ग्रामीण बँकेने दोन हजार ६५९ शेतकºयांना २२ कोटी ५० लाख ५३ हजार रुपयांचे पीक कर्ज जुलै महिन्याच्या मध्यावर वाटप केलेले आहे.
दरम्यान, जिल्हा सहकारी बँकेनेही पीक कर्ज वाटपात आघाडी घेतली असून चार हजार ८०९ शेतकºयांना २३ कोटी १४ लाख ४३ हजार रुपयांचे पीक कर्ज वाटप केलेले आहे.
शेतकºयांना पीक कर्ज वाटपासाठी सप्टेंबर अखेरपर्यंतची मुदत आहे. त्यातच जुलै महिन्यात जिल्ह्यात पावसाने चांगली हजेरी लावल्याने जवळपास ७० टक्के पेरण्या पूर्णत्वास गेल्या आहेत. त्यामुळे या काळात शेतकºयांना आता खºया अर्थाने पैशांची निकड आहे. त्यामुळे बँकांनी शेतकºयांना त्वरेने पीक कर्ज वाटप करावे यासाठी रेटा वाढविण्याची गरज आहे.
पुनर्गठणासाठी हवी संमती
जिल्ह्यातील ७१ हजार ३५१ शेतकरी हे पीक कर्जाच्या पूनर्गठणासाठी पात्र आहेत. जवळपास ५५४ कोटी रुपयांच्या पीक कर्जाचे यंदा वाटप करावयाचे आहे. मात्र पीक कर्जाचे पूनर्गठन करावयाचे असल्यास संबंधीत शेतकºयांची त्यासाठी संमती लागणार आहे. ७१ हजार ३५१ शेतकºयांपैकी आतापर्यंत चार हजार ६८४ शेतकºयांनीच असी संमती दिली असल्याचे अग्रणी बँकेची आकडेवारी स्पष्ट करते. दरम्यान, ३१ जुलै २०१९ पूर्वी २०१८ च्या खरीप हंगामातील पीक कर्जाच्या पुनर्गठनाची कार्यवाही बँकांना करावी लागणार आहे. अनुषंगीक विषयान्वये बँकांनी काटेकोरपणे कार्यवाही करण्याबाबत यापूर्वीच निर्देशीत करण्यात आलेले आहे. राज्यस्तरीय बँकर्स समितीनेही समन्वय ठेवण्याबाबत पुर्वीच सुचीत केले होते.
शेतकºयांचे पीक कर्ज पूनर्गठन करावयाचे असल्यास संबंधित शेतकºयांची संमती आवश्यक आहे. सोबतच छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतंर्गत कर्जमाफी मिळाल्यानंतरच्या वर्षात शेतकºयांनी घेतलेल्या कर्जाची थकबाकी आहे. त्यामुळे प्रत्यक्षात जिल्ह्यात एक लाख १५ हजार ६४२ शेतकरी हे पीक कर्जासाठी पात्र ठरताहेत. अन्य शेतकºयांना पीक कर्ज देताना त्यामुळे अडचणी येत असल्याची माहिती जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक उत्तम मनवर यांनी दिली.
जिल्ह्यातील तीन लाख एक हजार १६७ शेतकºयांना पीक कर्ज वाटपाचे उदिष्ट ठरविण्यात आलेले आहेत. त्यांना एक हजार ७७३ कोटी ७७ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटप करावयाचे आहे. पैकी एक लाख ११ हजार ८८५ शेतकºयांकडे कर्ज थकित आहे. दरम्यान कर्जमाफी योजनेतंर्गत वनटाईम सेटलमेंटच जिल्ह्यातील २५ हजार ६४१ शेतकºयांनी केलेली नाही. योजनेतंर्गत कर्जमाफी झाल्यानंतर उर्वरित रकमेची शेतकºयांना वनटाईम सेलटमेंट करावी लागणार होती. ती करण्यात आलेली नाही.