बुलडाणा: दहा दिवसांच्या कठोर निर्बंधाच्या काळात महामार्ग, नागरी भागातील पेट्रोल पंप हे सर्वसामान्यांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. मात्र बुलडाणा येथील पोलिसपेट्रोल पंपावर इंधनासाठी मोठी गर्दी करणाऱ्या नागरिकांना पोलिसांनी चांगलाच चोप दिला.जिल्ह्यात सध्या कोरोना प्रतिबंधासाठी कठोर निर्बंध लावण्यात आले आहे. या कालावधीत जिल्ह्यातील सर्व पेट्रोल पंप हे सामान्य नागरिकांसाठी बंद ठेवण्यात आले आहे. केवळ मालवाहतूक, रुग्णवाहिका, शासकीय वाहने, अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी, परवानगी पास असलेली वाहने, प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी यांच्यासाठीच पेट्रोल पंपावरून इंधन उपलब्ध करून देण्यात येणार आहे. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी आणि संबंधित कंपन्यांचे प्रतिनिधी यांच्यावर ही जबाबदारी टाकण्यात आली आहे.
मात्र बुलडाणा येथील पोलिस पेट्रोल पंपावर अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली पेट्रोलसाठी अनेकांनी गर्दी केली होती. त्यांच्या सबबीही वेगवेगळ्या होत्या. येथे वाढती गर्दी पाहता कोरोना संसर्ग पसरण्याची शक्यता होती. त्यामुळे पोलिसांच्या एका पथकाने हातोहात पोलिस अधीक्षकांच्या कार्यालयालगत असलेल्या या पेट्रोल पंपावर धाव घेतली. सोबतच तेथे अकारण पेट्रोल घेण्यासाठी आलेल्यांना चांगलाच ‘प्रसाद’ दिला. मात्र पोलिसांची कुणकुण लागल्याने काहींनी पोलिस दिसताच तेथून धुम ठोकल्याने काही जण थोडक्यात बचावले.