- अनिल गवई लोकमत न्यूज नेटवर्क खामगाव: जगातले सगळेच धर्म महान आहेत. प्रत्येक धर्म सत्य आणि चांगल्या कमार्चीच शिकवणूक देत असतो. पण मानव त्या धर्माच्या धर्मग्रंथांमधल्या गोष्टींचं योग्य पालन करत नाही, आणि चुकीच्या दिशेनं जाऊ लागतो. चुकीच्या दिशेनं जाणाºया व्यक्तीला घडविण्यासाठी इस्कॉन ही संस्था प्रयत्नशील आहे. ‘ इस्कॉन’चे मदनसुंदर दास यांच्याशी साधलेला संवाद.
तणावमुक्त समाजासाठी ‘इस्कॉन’च्या प्रयत्नांबाबत काय सांगाल?प्रत्येक मनुष्याच्या जीवनात संकट येत असतात. संकटातून योग्य अर्थ काढला पाहीजे. संकटकाळी बुध्दीचा वापर केल्यास दु:ख आणि गोंधळातूनही मनुष्याला चांगला मार्ग सापडतो. अर्जुनाला दु:ख आणि द्विधा मनस्थितीत मार्गदर्शन करण्यासाठी भगवान श्रीकृष्णाने भगवत गीता सांगितली. भगवत गीता ही दु:खापासून मुक्ती देण्याचं प्रमुख साधन आहे. हे पटवून देण्यासाठी ‘इस्कॉन’ही संस्था झटत आहे.
समाजात संस्कार रूजविण्यासाठी ‘इस्कॉन’चे योगदान काय ?समाजातील प्रत्येक मनुष्य सुखाच्या शोधात धडपडत आहे. परंतु, खरे सुख कशात आहे, याची जाणिव त्याला नाही. त्यामुळे अनेक मनुष्य आपलं अनमोल आयुष्य व्यर्थ घालवित आहेत. संस्कार आणि नितिमुल्य रुजविण्यासाठी गीता जयंतीच्या पर्वावर देशात एकाचवेळी भगवत् गीतेतील विविध अध्यायांवर आधारीत स्पर्धा घेत, विद्यार्थ्यांमध्ये जाणिव जागृती केली जाते.
भगवत गीतेला विज्ञाननिष्ठ मानता येईल का? निश्चितच...भगवत गीता केवळ एका धर्माचा ग्रंथ नाही. श्रीमद् भगवत गीतेत कर्मयोग अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. हा कर्मयोग माणसाला विज्ञानाचे माहात्म्य सांगतो. एकीकडे विधात्यावर श्रद्धा ठेवण्याचे आवाहन गीतेत आहे, तर दुसरीकडे विज्ञानवादी दृष्टिकोनाचा अंगीकार करायला शिकवला जातो. त्यामुळे भगवत गीता ही विज्ञाननिष्ठ आहे, असे आपले प्रामाणिक मत आहे. काम, क्रोध, मोह, मद, मत्सर, इर्षा हे सहा विकार माणसाला बाहेरून त्रास देतात. तर इच्छा माणसाला आतून त्रास देते. या सहा विकारांच्या ताब्यात गेलेले मन व शरीर निरोगी राहीलच कसे?सहा विकारांवर विजय मिळवणे सोपे नाही. पण आपले मन ताब्यात राहिले. तरच मनावरचा ताण अपोआप हलका होतो.
‘इस्कॉन’शी आपण केव्हापासून जुळलात?अमेरिकेतील ओहियो स्टेट विद्यापीठातून इलेक्ट्रीकल आणि कम्प्युटर इंजीनिअरिंगमध्ये मास्टर डिग्री मिळविली. त्यानंतर जुनिपर नेटवर्क, युएसए येथे इंजिनीअरम्हणून काम केले. या कालावधीत सन २०११ मध्ये शोध प्रबंधांसाठी प्रतिष्ठित ‘कर्मचारी उत्कृष्टता पुरस्काराने’ सन्मानित करण्यात आले. दरम्यान, भगवत गीतेतील संदेश आणि इस्कॉनचे संस्थापक श्रील प्रभुपाद यांच्या जीवनकार्याने प्रेरीत झाल्याने मायदेशी म्हणजे भारतात परत आलो. सन २०१२ मध्ये वैदीक कला आणि विज्ञानाचे पूर्णकालिक विद्यार्थी म्हणून इस्कॉनमध्ये सहभागी झालो. इस्कॉनशी जुळल्यानेच आपल्याला स्व:तची खरी ओळख झाली. त्यामुळे इस्कॉनशी जुळल्याचा मनस्वी आनंद आहे. अज्ञानामुळेच मनुष्य भेदा-भेद पाळत आहे.