खामगाव : पेट्रोल, डिझेल, गॅस दरवाढीच्या निषेधार्थ काँग्रेसच्या वतीने १० सप्टेंबररोजी भारत बंदचे आयोजन करण्यात आले आहे. या बंदमध्ये व्यापारी बंधूंनी सहभाग दर्शवून आपली प्रतिष्ठाने बंद ठेवावीत असे आवाहन खामगाव मतदार संघाचे माजी आमदार दिलिपकुमार सानंदा यांनी केले आहे. सर्वसामान्य जनतेच्या दैनंदिन जिवनावर थेट परिणाम करणाºया, पेट्रोल, डिझेल, गॅस सिलिंडरच्या दरात सातत्याने वाढ होऊन इंधन दरवाढीने उच्चांक गाठला आहे. या भाववाढीमुळे शेतकरी, शेतमजुर, व्यापारी व सामान्य जनतेचे जगणे कठीण झाले असुन जनतेच्या त्रासात दिवसेंदिवस अधिकच वाढ होत आहे. या व अशा शासनाच्या चुकीच्या निर्णयांमुळे जनता अधिकच त्रस्त झाली आहे. एकीकडे जनतेला अच्छे दिनचे स्वप्न दाखवून सत्ता हस्तगत करायची व त्याच जनतेला इंधन दरवाढ करुन त्यांचे जगणे महाकठीण करायचे. या दरवाढीपासून दिलासा देण्यासाठी सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या उत्पादन शुल्कामध्ये सवलत देण्यास स्पष्ट नकार द्यायचा हे तर जीवनावश्यक वस्तूंच्या दरवाढीने झालेल्या जनतेच्या जखमांवर मीठ चोळण्याच प्रकार असल्याचा आरोप दिलिपकुमार सानंदा यांनी केला आहे. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने सरकारच्या जनविरोधी कार्यपद्धतीचा निषेध नोंदविण्यासाठी व अन्यायकारक रितीने केलेली भाववाढ तातडीने कमी करण्यात यावी ही प्रमुख मागणी घेवून १० सप्टेंबरला भारत बंदचे आवाहन करण्यात आले आहे. खामगाव विधानसभा मतदारसंघातील तमाम जनतेने या बंदमध्ये सामील होऊन स्वयंस्फुतीर्ने आपापली प्रतिष्ठाने बंद ठेवावी व या सर्वसामान्यांच्या हितास्तव असलेल्या भारत बंदला सहकार्य करावे असे आवाहन सानंदा यांनी केले आहे.