लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : भाईचंद हिराचंद रायसोनी सहकारी पतसंस्थेत अनेक ठेवीदारांच्या लाखो रुपयांच्या ठेवी अडकलेल्या असून, सदर ठेवी परत मिळण्यासंदर्भात कोणतीही कार्यवाही होताना दिसत नाही. त्यामुळे ठेवीदार आर्थिक अडचणीत सापडल्याने त्यांची अवस्था सैरभैर झाल्याचे दिसत आहे. या ठेवी परत मिळण्याची आशा ठेवीदार बाळगून आहेत. बीएचआर पतसंस्थेत अनेक ठेवीदारांनी लाखो रुपयांच्या ठेवी ठेवल्या होत्या; परंतु सुमारे दोन वर्षांपूर्वी या पतसंस्थेत काळ्या पैशांचे व्यवहार झाल्याचे आढळून आले. त्यामुळे ही पतसंस्था अडचणीत येऊन बंद पडली आहे. दरम्यान, या पतसंस्थेच्या अध्यक्षांसह सर्व संचालकांविरुद्ध दाखल तक्रारीवरून सर्वांना अटक करण्यात आलेली असून, मागील काही महिन्यांपासून सर्व संचालक कारागृहातच आहेत. त्यांना अद्याप जामीन मिळालेला नाही; मात्र या पतसंस्थेत लाखो रुपयांच्या ठेवी ठेवणारे ठेवीदार अडचणीत सापडले आहेत. दरम्यान, जळगाव येथील बीएचआरचे मुख्य कार्यालय वगळता सर्व शाखा कार्यालये गुंडाळण्यात आलेली आहेत. त्यामुळे आपल्या ठेवी परत मिळण्यासाठी ठेवीदार जळगाव येथे चकरा मारीत असून, अनेकजण आर्थिक अडचणीत सापडल्याचे दिसून येते. या पतसंस्थेच्या ठेवीदारांनी संघटना स्थापन करून आंदोलनही केले होते; परंतु त्याचा फारसा उपयोग झाला नाही. आता सर्व संचालक कारागृहात असल्याने ठेवीदारांचा आंदोलनाचा मार्गही बंद झाला आहे. त्यामुळे हे ठेवीदार सध्या पैशांअभावी विविध अडचणींचा सामना करताना दिसतात.
मी पाठीच्या दुखण्यामुळे त्रस्त होऊन १५ वर्षांपूर्वी नोकरीचा राजीनामा दिला. त्यावेळी मिळालेल्या प्रॉव्हिडंट फंडाच्या रकमेतील तीन लाख रुपये बीएचआर पतसंस्थेत ठेवले होते. त्यावरील व्याजावर आपली म्हातारपणात गुजराण होईल, असे वाटले होते; परंतु ही पतसंस्था बंद झाल्याने व्याज व मूळ रक्कम अडकली असून, बिकट परिस्थितीचा सामना करावा लागतो.- सुरेश सोनी, एक ठेवीदार, खामगाव.