बुलडाणा : अट्टल दुचाकी चोरट्यास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले. या दुचाकी चोरट्याने आतापर्यंत ११ दुचाकी पळविल्याची माहिती आहे. गेल्या एक ते दीड वर्षापासून चिखली शहरातील विविध भागातून मोटार सायकल च९ारीचे प्रमाण वाढले होते. एलसीबीचे पोलिस उपनिरीक्षक इम्रान इनामदार व त्यांच्या पथकाला दुचाकी चोरीबद्दल गुप्त माहिती मिळाली. त्यानुसार मेहकर तालुक्यातील नायगाव दत्तापूर येथील २० वर्षीय वैभव उर्फ गुड्डू राजू वानखेडे यास ताब्यात घेण्यात आले. विचारपूस केली असता त्याने चिखली व बुलडाणा येथून ११ दुचाकी चोरल्याची कबुली दिली. त्यामुळे चिखली पोलिस स्टेशनमध्ये दाखल पाच दुचाकी चोरी प्रकरणाची उकल झाली. चोरटा वैभव वानखेडे याने चोरलेल्या चार दुचाकी जानेफळ पोलिस स्टेशन हद्दीत बेवारस सोडल्या असून त्या जानेफळ पोलिसांनी जप्त केल्या आहेत. दुचाकी चोरीस गेलेल्या नागरिकांनी मूळ कागदपत्रांसह चिखली व जानेफळ पोलिस स्टेशनमध्ये संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. पोलिस अधीक्षक दिलीप पाटील भुजबळ, अपर पोलिस अधीक्षक संदीप डोईफोडे यांच्या आदेशान्वये स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक महेंद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक इम्रान इनामदार, सय्यद हारुन, सुधाकर काळे, सुनील खरात, प्रवीण पडोळ यांच्या पथकाने ही कारवाई केली.
अट्टल दुचाकी चोरटा एलसीबीच्या जाळ्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 09, 2019 6:36 PM