बुलडाणा जिल्ह्यात भाजपचे मेळावे; विरोधकांची आंदोलने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 9, 2017 01:37 AM2017-11-09T01:37:34+5:302017-11-09T01:37:58+5:30
बुलडाणा: नोटबंदी वर्षपूर्तीच्या पृष्ठभूमीवर जिल्ह्यात काँग्रेसतर्फे काळा दिन पाळण्यात येऊन तहसील स्तरावर जिल्हाभर निदर्शने करण्यात आली, तर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे तालुका तथा जिल्हा स्तरावर चक्क मंडप टाकून नोटबंदी निर्णयाचा विरोध करीत राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे जिल्हाभर या निर्णयाच्या वर्षपूर्तीचे श्राद्ध घालण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: नोटबंदी वर्षपूर्तीच्या पृष्ठभूमीवर जिल्ह्यात काँग्रेसतर्फे काळा दिन पाळण्यात येऊन तहसील स्तरावर जिल्हाभर निदर्शने करण्यात आली, तर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे तालुका तथा जिल्हा स्तरावर चक्क मंडप टाकून नोटबंदी निर्णयाचा विरोध करीत राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे जिल्हाभर या निर्णयाच्या वर्षपूर्तीचे श्राद्ध घालण्यात आले. देऊळगावराजामध्ये तर चक्क सुमारे ५00 जणांना या श्राद्धाचे जेवणही देण्यात आल्याची माहिती राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अँड. नाझेर काझी यांनी दिली. दरम्यान, नोटबंदीचा निर्णय अर्थव्यवस्थेच्या इतिहासात क्रांतिकारक असल्याचे भाजपतर्फे सांगण्यात येत आहे, तर विरोधकांकडून खेळायचे असले, तर खोट्या नोटांशी खेळा, अर्थव्यवस्थेशी नाही, असे टोले लगावण्यात आले.
काँग्रेसतर्फे बुलडाणा, चिखली, देऊळगावराजा, मोताळा, सिंदखेड राजा आणि मेहकर येथील तहसील कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. मेहकर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाटिकेजवळून निषेध रॅलीही काढण्यात येऊन भाजपचा निषेध करीत तीव्र घोषणाबाजी करण्यात आली. काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस श्याम उमाळकर, नगराध्यक्ष कासम गवळींसह अन्य नेते यात सहभागी झाले होते. तसेच सत्ताधारी भाजप सरकारवर टीका करण्यात आली. नोटबंदीदरम्यान मृत पावलेल्या व्यक्तींना मेहकरमध्ये श्रद्धांजली वाहण्यात येऊन काळा दिवस पाळण्यात आला. सोबतच नोटबंदीच्या काळात मृत पावलेल्या दीडशे व्यक्तींना चिखलीतही श्रद्धांजली वाहण्यात आली, तसेच भाजपच्या धोरणाविरोधात घोषणाबाजीही करण्यात आली. चिखलीध्ये आमदार तथा जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसतर्फेही देऊळगावराजा, सिंदखेडराजा, बुलडाणा, चिखली, मेहकरमध्ये आंदोलन करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेसने तर चक्क काही ठिकाणी पेंडॉल टाकून नोटबंदीचे रीतसर श्राद्ध घातले.
देऊळगावराजा येथील आंदोलनादरम्यान, जवळपास ५00 जणांना या श्राद्धाचे जेवणही देण्यात आल्याचे जिल्हाध्यक्ष अँड. नाझेर काझी यांनी सांगितले. माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे भाजप सरकारने घेतलेला हा निर्णय म्हणजे जनतेच्या दृष्टीने एक विनाशकारी पाऊल होते, असे स्पष्ट केले. ज्या कारणामुळे ती करण्यात आली, त्यापैकी एकही बाब साध्य झाली नसल्याचे ते म्हणाले.
दावे प्रतिदावे
एकीकडे भाजपने संपूर्ण जिल्ह्यात नोटबंदी निर्णयाच्या वर्षपूर्तीनिमित्त जिल्हा तथा तालुका स्तरावर मेळावे घेऊन यामुळे आर्थिक क्रांती झाल्याचा दावा केला आहे. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसने खोट्या नोटांचे पाकीट थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठविले आहे. नोटांशी खेळायचे असले, तर या नोटांशी खेळा, भारतीय अर्थव्यवस्थेशी खेळू नका, असा मानस राष्ट्रवादीच्या नेत्यांनी व्यक्त करीत हे पाकीट पाठविले आहे. त्यामुळे एकीकडे आर्थिक क्रांती झाल्याचे भाजपतर्फे सांगण्यात येत आहे, तर दुसरीकडे हा निर्णय अर्थव्यवस्था आणि जनतेसाठी विनाशकारी असल्याचा दावा काँग्रेस, राष्ट्रवादीकडून केल्या गेला आहे.