खामगाव: कायदेतज्ज्ञ, अर्थतज्ज्ञ, देशाचे खंबीर नेतृत्व तसेच भाजपाचे संकटमोचक आज आपल्यातून काळाच्या पडद्याआड गेले. एक मुत्सद्दी राजकारणी हरपल्याने संपूर्ण देशवासीयांना दुःख झाले आहे. अशा प्रकारच्या शोक संवेदना व्यक्त करीत राज्याचे मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांनी माजी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांना आदरांजली अर्पण केली. राज्यातील पूर परिस्थिती व माजी केंद्रीय मंत्री सुषमा स्वराज यांच्या निधनामुळे ७ ऑगस्ट रोजीची महाजनादेश यात्रा तात्पुरत्या स्वरुपात स्थगित करण्यात आली होती. त्यानंतर २४ ऑगस्ट रोजी भाजपाची ही महाजनादेश यात्रा खान्देशातून मलकापुरात शनिवारी सकाळी दाखल झाली. माजी केंद्रीय अर्थमंत्री स्व. अरुण जेटली यांच्या दु:खद निधनामुळे आजच्या महाजनादेश यात्रे निमित्त आयोजित सभेचे शोकसभेत रूपांतर झाले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी माजी केंद्रीय मंत्री स्व. अरुण जेटली यांच्या दु:खद निधनामुळे जनादेश यात्रेला स्थगिती दिल्याचे सांगत अरुण जेटली यांच्या जीवनावर प्रकाश झोत टाकीत आदरांजलीपर भावना व्यक्त केल्या.दहा मिनिटातच सभा आटोपती घेण्यात आली. पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले मलकापूरचे वीर जवान स्वर्गीय संजयसिंह राजपूत यांना सुद्धा श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यानंतर खामगाव येथे मुख्यमंत्री २.३० वाजता दाखल झाले. त्याठिकाणी मोटारसायकल रॅलीसोबत ते खामगाव येथील न.प. मैदानावर पोहचले. याठिकाणी सुद्धा अरुण जेटलींना भावपूर्ण श्रद्घांजली अर्पण करीत त्यांच्या कार्यावर प्रकाश टाकला. यानंतर शेगाव येथील शोक सभेसाठी ते निघाले. शेगाव येथे पोहचल्यानंतर त्यांनी प्रथम गजानन महाराजांच्या समाधीचे दर्श़न घेतले. याठिकाणी संस्थानचे विश्वस्त निळकंठ पाटील यांनी त्यांचे स्वागत करीत पूर ग्रस्तांचा निधी सुपूर्द केला. यानंतर कॉटन मार्केटमध्ये शोक सभा पार पडली. या सभेला केंद्रीय मंत्री संजय धोत्रे, ना. रणजित पाटील, ना. गिरीश महाजन, ना. संजय कुटे, ना. चैनसुख संचेती, आमदार अॅड. आकाश फुंडकर, भाजपा जिल्हाध्यक्ष धुपतराव सावळे, जि. प. अध्यक्ष सौ. उमाताई तायडे आदी उपस्थित होते.
भाजपचे संकटमोचक आमच्यातून निघून गेले : देवेंद्र फडणवीस
By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2019 7:24 PM