बुलडाणा : सुजलाम सुफलाम प्रकल्पाच्या माध्यमातून बुलडाणा जिल्ह्यातील शेती व शेतकरी अजून समृद्ध करण्याच्या दिशेने आता प्रयत्न होणार आहेत. बीजेएसचे संस्थापक शांतिलाल मुथ्था यांच्या संकल्पनेतून सुरु होणार असलेल्या या पुढील टप्प्यातील कामाची दिशा आता निश्चित होत आहे. मोताळा, जळगाव जामोद व संग्रामपूर तालुक्यातील ५० शेतकºयांनी समृद्धी यात्रेअंतर्गत नुकतीच हिवरे बाजार व राळेगणसिद्धी येथे भेट दिली. चेन्नईस्थित मिशन समृद्धी संस्थेच्या सहकार्याने ही अभ्यास सहल आयोजित करण्यात आली होती. हिवरे बाजार व राळेगणसिध्दी या दोन्ही गावांमध्ये आदर्श गाव म्हणून करण्यात आलेले काम हे अत्यंत उपयुक्त स्वरूपाचे असल्याने या ठिकाणच्या कामाची माहिती घेण्याकरिता हा उपक्रम आयोजित केला होता. हिवरे बाजार मध्ये झालेल्या पाणलोट क्षेत्र विकास, ग्राम विकास, दुग्धविकास, फळबाग लागवड, सुसज्ज शाळा, ग्रामसंसद इमारतीची पाहणी, मागील १५ वर्षाहून अधिक काळ सुस्थितीमध्ये असलेले व एकदाही डागडुजी करावी न लागलेले अंतर्गत रस्ते, युवकांचे संघटन, व्यसनमुक्ती, प्रत्येक कामासाठी गाव पातळीवर समिती अशा अनेकविध वैशिष्ट्यांनी परिपूर्ण माहिती राज्याच्या आदर्श गाव योजनेचे प्रमुख पोपटराव पवार यांनी दिली. ही सर्व कामे पाहताना शेतकरी आश्चर्य व्यक्त करीत होते. स्वातंत्र्यदिनी राळेगणसिद्धी येथे ज्येष्ठ समाजसेवक अण्णासाहेब हजारे यांनी केलेल्या उत्तुंग कामाची माहिती घेण्यात आली. यावेळी त्यांनी केलेले अमूल्य मार्गदर्शन सर्वांच्याच स्मरणात राहील असे होते. कोणत्याही चांगल्या सामाजिक कामासाठी कोणालातरी आधी त्याग करावा लागतो, तरच मोठे काम उभे राहते. कृती आणि बोलणे यातील फरक कमी झाला पाहिजे. सामाजिक कामासाठी उत्तम निष्कलंक चारित्र्य, त्याग आणि समर्पण भावना गरजेची असल्याचे मत यावेळी त्यांनी मांडले. येथे झालेल्या ध्वजारोहण कार्यक्रमालाही या सर्व शेतकºयांनी हजेरी लावली. मिशन समृद्धी संस्थेचे प्रकल्प संचालक राम पप्पू हे देखील आपल्या सहकाºयासमवेत या यात्रेत सहभागी झाले होते. लवकरच जिल्ह्यासाठी करावयाच्या पुढील कामाचे नियोजन करण्याचा मनोदय त्यांनी यावेळी व्यक्त केला.
पहिल्या टप्प्यात २८३ ठिकाणाहून गाळ काढला
बुलडाणा जिल्ह्यातील या प्रकल्पात पहिल्या टप्प्यात २८३ ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात गाळ काढण्यात आला. सुमारे ४००० पेक्षा अधिक शेतकºयांच्या शेतात तो पसरवण्यात आला. यामुळे कित्येक हेक्टरमधील पडीक जमीन आता शेतीयोग्य झाली आहे. बुधवारी रात्रीपासून जिल्ह्यात झालेल्या दमदार पावसाने गाळ काढलेल्या ठिकाणी आता मोठ्या प्रमाणात पाणीसाठा तयार होण्याची शक्यता वाढली आहे.