लोकमत न्यूज नेटवर्कनांदुरा : बुलडाणा एलसीबीच्या पथकाने बुधवारी नांदुरा येथे कारवाई करीत काळ्याबाजारात विकल्या जाणारे १० रेमडेसीवीर इंजेक्शन जप्त केले आहेत. या प्रकरणात तीन जणांना अटक करण्यात आली आहे. ही कारवाई बुधवारी संध्याकाळी करण्यात आली. कोरोना महामारीच्या काळात लोकांच्या गरजेचा गैरफायदा घेऊन काही जण रेमडेसीवीर इंजेक्शनचा काळाबाजार करीत आहेत. नांदुरा येथील गैबी नगरमध्ये तीन जण रेमडेसीवीर विकत असल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यावरून एलसीबीच्या पथकाने सापळा रचत ही कारवाई केली. गैबीनगर मधील आझाद खा युनूस खा, नुरआलम अबूबकर अन्सारी ( रा झारखंड), शेख इरफान शेख (रा. नांदुरा) या तिघांना अटक केली आहे. ही कारवाई एपीआय मोरे यांंनी केली.दरम्यान बुलडाणा जिल्ह्यातही रेमडेसिविरचा काळा बाजार होत असल्याचे यामुळे आता उघड होत आहे. यापूर्वीही बुलडाण्यातील कोवीड समर्पीत रुग्णालयात एका कक्ष सेवकाने रेमडेसिविर संदर्भात गैरप्रकार केला होता. त्याच्या विरोधातही कारवाई करण्यात आली होती. त्यानंतरचे हे जिल्ह्यातील उघड झालेले दुसरे प्रकरण म्हणावे लागले. सध्या तीनही आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहेत.
रेमडेसीवीरचा काळाबाजार; नांदुरा येथे तिघांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 06, 2021 11:56 AM