लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजार केल्याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बुलडाणा शहरातील दोन नामांकित रुग्णालयातील तीन कर्मचाऱ्यांना अटक केली आहे. त्यांच्याकडून नऊ रेमडेसिविर आणि सहा मोरोपीनम इंजेक्शनसह २ लाख ५४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. बुलडाणा शहरानजीक येळगाव फाटा परिसरात शुक्रवारी ही कारवाई करण्यात आली. यामध्ये राम गडाख (रा. येळगाव), लक्ष्मण तरमळे (रा. पि. सराई) आणि संजय इंगळे (रा. हतेडी) या तिघांना अटक करण्यात आली. शहरातील दोन नामांकीत रुग्णालयात हे तीघे काम करतात. या आरोपींकडून दोन दुचाकी, दोन मोबाईलही जप्त करण्यात आले आहेत. स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारावर ७ मे रोजी दुपारी १ वाजताच्या सुमारास या तिघांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून उपरोक्त इंजेक्शन आणि मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत जिंदमवार, पोलीस हेड कॉन्स्टेबल सय्यद हारुण, सुधाकर काळे, सुनील खरात, संदीप मोरे, युवराज शिंदे, भारत जंगले, गजानन गोरले यांच्यासह अन्य कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला होता. अन्न व अैाषध मंत्र्यांच्या जिल्ह्यातील ही दुसरी कारवाई आहे.
रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजार, रुग्णालयातील तीन कर्मचाऱ्यांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 08, 2021 9:40 AM