महिलांच्या हाती एसटीचे स्टेअरिंग येण्यापूर्वीच लागला ब्रेक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 05:52 AM2021-01-08T05:52:24+5:302021-01-08T05:52:24+5:30
राज्य परिवहन महामंडळाने एसटीमध्ये महिला चालक येणार असल्याचा गाजावाजा करून सरळसेवा भरती घेतली होती. त्यामध्ये राज्यात १६३ महिलांची नियुक्ती ...
राज्य परिवहन महामंडळाने एसटीमध्ये महिला चालक येणार असल्याचा गाजावाजा करून सरळसेवा भरती घेतली होती. त्यामध्ये राज्यात १६३ महिलांची नियुक्ती करण्यात आली. नियुक्तीनंतर प्रशिक्षणही सुरू झाले होते. परंतु काही दिवसातच कोरोनामुळे चालक, वाहक उमेदवारांचे हे प्रशिक्षण स्थगित करण्यात आले. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर पुढील प्रशिक्षण पुन्हा चालू करून प्रशिक्षण संपताच उमेदवारांना सेवेमध्ये घेण्यात येईल, असे स्पष्ट करण्यात आले होते. परंतु राज्यात सर्व व्यवहार सुरळीत झाल्यानंतर व बससेवा संपूर्णपणे पूर्ववत सुरू झाली असतानाही चालक-वाहकांचे सेवापूर्व प्रशिक्षण सुरू करण्याला मुहूर्त मिळाला नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे महिला उमेदवारांचे उर्वरित चालकाचे प्रशिक्षण न देता वाहकाचे प्रशिक्षण देऊन वाहक म्हणून त्यांना रुजू करून घ्यावे, अशी मागणी राज्यभरातील उमेदवारांनी एसटी महामंडळाकडे मागील महिन्यात केली होती. परंतु ही भरतीप्रक्रिया चालक तथा वाहक या पदासाठी असल्याने जाहिरातीतील पात्रतेमध्ये बदल न करता महिला उमेदवारांना फक्त वाहक पदासाठी प्रशिक्षण देऊन वाहक पदात रुजू करून घेता येणार नाही, असे आदेश राज्य परिवहन महामंडळाकडून देण्यात आले आहेत. त्यामुळे चालक, वाहक पदासाठी नियुक्त झालेल्या उमेदवारांमध्ये नाराजी दिसून येत आहे.
प्रशिक्षणाबाबत मार्गदर्शन प्राप्त होताच कार्यवाही
उमेदवारांचे प्रशिक्षण सुरू करण्याबाबत मध्यवर्ती कार्यालय राज्य परिवहन महामंडळ, मुंबई यांना मार्गदर्शन मागविण्यात आले आहे. प्रशिक्षणाबाबत मार्गदर्शन प्राप्त होताच उमेदवारांचे पुढील सेवापूर्व प्रशिक्षण सुरू करण्यात येईल.
संदीप रायलवार, विभाग नियंत्रक, बुलडाणा