लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: जिल्हा सामान्य रुग्णालयातील अग्नीशमन यंत्रणेचे सर्वेक्षण करून तसे नुतनीकरणाचे प्रमाणपत्रच घेण्यात आले नसल्याचे शनिवारी ‘लोकमत’ने केलेल्या ‘रिॲलिटी चेक’ मध्ये समोर आले आहे. विशेष म्हणजे गेल्या पाच वर्षात यासंदर्भात एकदाही प्रयत्न करण्यात आलेला नाही.भंडारा येथे जिल्हा सामान्य रुग्णालयातील अतिदक्षता नवजात शिशु केअर युनीटमध्ये ९ जानेवारी रोजी पहाटे आग लागून १० नवजात बालकाचा होरपळून मृत्यू झाल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा सामान्य रुग्णालयासह खामगाव, मलकापूर, शेगाव येथील उपजिल्हा रुग्णालयात हा ‘रिॲलिटी चेक’ करण्यात आला. त्यावेळी ही बाब समोर आली.बुलडाणा जिल्हा सामान्य रुग्णालयातील अग्नीशमन यंत्रे सुस्थितीत असली, तरी दर ११ महिन्यांनी या यंत्रांची व आगीच्या संदर्भाने रुग्णालय सुरक्षीत आहे, की नाही यासंदर्भात सर्वेक्षण करून पालिकेच्या अग्नीशमन दलाकडून तसे प्रमाणपत्र घ्यावे लागते; मात्र बुलडाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात गत पाच वर्षात असे सर्वेक्षणच करण्यात आलेले नाही. तशी मागणीही पालिकेच्या अग्नीशमन दलाकडे करण्यात आली नसल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या या सर्वेक्षणासाठी जवळपास दहा हजार रुपये खर्च अपेक्षीत असल्याचे सूत्रांनी सांगितले. दुसरीकडे, १०० खाटांच्या स्त्री रुग्णालय व वर्तमान स्थितीत समर्पीत कोवीड रुग्णालयातील अग्नीश्यामक यंत्रणेचे तपासणी व सर्वेक्षणासाठी ३१ डिसेंबर २०२० रोजी पालिका प्रशासनास पत्र देण्यात आले आहे. येथील सर्वेक्षण सोमवारी केले जाणार असल्याचे पालिकेचे उपमुख्याधिकारी एस. के. लघाने यांनी सांगितले.
अतिदक्षता विभागात अग्निशमन यंत्राचा अभाव!जिल्हा सामान्य रुग्णालयातील अतिदक्षता विभागात अग्निशमन यंत्रच लावण्यात आलेले नसल्याचे प्रत्यक्ष पाहणीत समोर आले. भांडारगृह, नवजात शिशू केअर युनीट आणि कॅज्युल्टी विभागात अशी अग्नीशमन यंत्र लावण्यात आलेले व सुस्थितीत असल्याचे पाहणीत समोर आले. इलेक्ट्रीकल अग्नीरोधक म्हणून काम करणाऱ्या सीअेाटू प्रकारच्या अग्नीशमन यंत्राचे प्रेशरही योग्य असल्याचे पाहणीत समोर आले; मात्र काही यंत्रांना आवश्यक असलेले नोझल नसल्याचे दिसून आले.
एक महिन्यापूर्वी जिल्हा सामान्य रुग्णालयातील सर्जरीची खोली व अन्य ठिकाणची वायरिंग सुस्थितीत करून नवीन स्वीच बसविण्यात आलेले आहेत. तसेच नवजात शिशू केअर विभागातील परिचारिका, डॉक्टर यांना सुरक्षेसंदर्भात प्रशिक्षण व सूचना पूर्वीच दिलेल्या आहेत.- डॉ. नितीन तडस, जिल्हा शल्यचिकित्सक, बुलडाणा