स्वाध्याय उपक्रमात बुलडाणा जिल्हा राज्यात द्वितीय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2021 11:11 PM2021-03-08T23:11:11+5:302021-03-08T20:25:01+5:30
Buldhana News इयत्ता पहिली ते दहावीच्या मराठी इंग्रजी व उर्दू माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी स्वाध्याय उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे.
- अनिल गवई
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव: राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांचे कडून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर इयत्ता पहिली ते दहावीच्या मराठी इंग्रजी व उर्दू माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी स्वाध्याय उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे. या उपक्रमात बुलडाणा जिल्ह्याने राज्यात द्वितीय तर अमरावती विभागात प्रथम क्रमांक पटकाविला आहे.
विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमासोबत जोडून ठेवण्यासाठी महत्वपूर्ण असलेल्या स्वाध्याय उपक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी मुख्य कार्यकारी अधिकारी जि . प .बुलडाणा यांचे मार्गदर्शनात जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य यांचे अध्यक्षतेखाली शिक्षणाधिकारी माध्यमिक, शिक्षणाधिकारी प्राथमिक,डाएट बुलडाणाचे सर्व अधिव्याख्याता ,विषय सहाय्यक -समुपदेशक, जिल्ह्यातील सर्व गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी ,केंद्रप्रमुख, साधनव्यक्ती, सर्व मुख्याध्यापक, शिक्षक यांची झूमद्वारे आढावा बैठक मागील आठवड्यात घेण्यात आली. त्या बैठकीचा सकारात्मक परिणाम म्हणून स्वाध्याय उपक्रमाच्या १६ व्या आठवड्यात बुलडाणा जिल्ह्याने राज्यातून द्वितीय क्रमांक प्राप्त केला आहे. याबद्दल जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री विसपुते, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ .विजयकुमार शिंदे, शिक्षणाधिकारी (माध्यमिक ) प्रकाश मुकुंद ,शिक्षणाधिकारी (प्राथमिक ) सचिन जगताप यांनी आनंद व्यक्त केला आहे.
जिल्ह्यातून सर्वाधिक विद्यार्थ्यांचा सहभाग!
-स्वाध्याय उपक्रमाच्या सोळाव्या आठवड्यात बुलढाणा जिल्ह्यातून एक लक्ष एक हजार ५३५ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. यापैकी ९३ हजार १५ विद्यार्थ्यांनी स्वाध्याय सोडविले. तर ८८ हजार ५६ विद्यार्थ्यांनी ते पूर्ण केले. या उपक्रमाला मोठ्या संख्येने प्रतिसाद देत बुलडाणा जिल्ह्याने राज्यात दुसरा तर अमरावती विभागात प्रथम क्रमांक पटकावला आहे. या आठवड्यात जळगाव जिल्हा राज्यात प्रथम क्रमांकावर आहे .
पुढील काळात बुलडाणा जिल्ह्यातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना या उपक्रमात सहभागी करत बुलडाणा जिल्हा राज्यात प्रथम क्रमांक प्राप्त करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे.
- डॉ. विजयकुमार शिंदे
प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, बुलडाणा