लोकमत न्यूज नेटवर्कमोताळा(बुलडाणा): बेकायदा गर्भपात आणि लिंग निदान प्रकरणी बोराखेडी पोलिसांनी गुजरामधील सुरत येथून या प्रकरणातील एका मध्यस्थास अटक केली आहे. मोताळा तालुक्यातील राजूर येथील प्रकरणात त्यास ताब्यात घेण्यात आले आहे. दरम्यान, या कारवाईमुळे या प्रकरणाचे गुजरात कनेक्शन स्पष्ट झाले आहे. परिणामी या प्रकरणात आता आरोपींची संख्या पाच झाली असून, आणखी काही आरोपी या प्रकरणात वाढण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे. अभिषेक ठाकूर असे अटक करण्यात आलेल्या मध्यस्थाचे नाव आहे. त्याला मोताळा न्यायालयाने १३ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. बोराखेडीचे ठाणेदार अविनाश भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक देवाजी बोर्डे, पोलीस कॉन्स्टेबल नरेश रेड्डी, दामोदर लठाड यांनी त्यास सुरत येथून ताब्यात घेतले. ३२ वर्षीय अभिषेक सुरतमध्ये विष्णू नगरात राहत होता. त्याच्या घरातून त्यास ताब्यात घेण्यात आले आहे. गुजरातमधील पांडेसरा पोलिसांचे या कामी बोराखेडी पोलिसांना सहकार्य मिळाले. शुक्रवारी रात्री त्यास बोराखेडी येथे आणण्यात आले. दरम्यान, प्रभारी ठाणेदार दीपक वळवी यांनी शनिवारी त्यास न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्याची १३ मार्चपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी केली. बीड जिल्ह्यातील २४ वर्षीय विवाहितेचे गुजरात राज्यात गर्भलिंग निदान करण्यात आले होते. गर्भपातासाठी तिला कुटुंबीयांनी मोताळा तालुक्यातील गुळभेली येथील ब्रीजलाल सुपडा चव्हाण याच्याशी संपर्क साधला होता. कोणतीही वैद्यकीय अर्हता नसलेल्या ब्रीजलाल चव्हाण याने राजूर येथे सदर विवाहितेचा अवैधरीत्या गर्भपात करताना, तिची प्रकृती बिघडल्याने तिला बुलडाण्यातील डॉ. सय्यद आबिद हुसेनकडे नेण्यात आले होते. परंतु तिची प्रकृती नाजूक असल्याने तिला अकोला हलविण्यात आले होते. त्यानंतर या प्रकरणाचे बिंग फुटले होते. प्रकरणी मोताळा येथील तत्कालीन वैद्यकीय अधीक्षकांच्या तक्रारीवरून आरोपींविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले. डिसेंबर २०१७ मध्ये प्रकरणात ब्रीजलाल सुपडा चव्हाण (५० रा. गुळभेली, ता. मोताळा), डॉ. सैय्यद आबिद हुसेन सय्यद नजीर (४९, रा. बुलडाणा), गर्भपात करून घेणारी २४ वर्षीय विवाहिता व तिचा पती किशोर सुदामराव चाळक (२९, रा. किनगाव, ता. गेवराई, जि. बीड) या चौघांना अटक करण्यात आली होती. दरम्यान, त्यांना जामीन न मिळाल्यामुळे जवळपास ते अडीच महिन्यांपासून तुरुंगातच असल्याची माहिती आहे, तर डोणगाव येथेही दत्तात्रय रुग्णालाच्या दोन सोनोग्राफी मशीन सील करण्यात आल्या आहेत. (तालुका प्रतिनिधी)
बुलडाणा: बेकायदा गर्भपात; एकास गुजरातेत अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2018 12:59 AM
मोताळा(बुलडाणा): बेकायदा गर्भपात आणि लिंग निदान प्रकरणी बोराखेडी पोलिसांनी गुजरामधील सुरत येथून या प्रकरणातील एका मध्यस्थास अटक केली आहे. मोताळा तालुक्यातील राजूर येथील प्रकरणात त्यास ताब्यात घेण्यात आले आहे. दरम्यान, या कारवाईमुळे या प्रकरणाचे गुजरात कनेक्शन स्पष्ट झाले आहे.
ठळक मुद्देसंशयित डॉक्टर आरोग्य यंत्रणेच्या ‘रडार’वर