लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : पोलिसांचे दळणवळण अधिक गतिमान करण्याच्या दृष्टिकोनातून १६ चारचाकी वाहने व १९ दुचाकी पोलीस दलात समाविष्ट करण्यात आल्या आहेत. जवळपास एक कोटी २५ लाख २५ हजार रुपये खर्च या वाहनांवर झाला आहे. दरम्यान, प्रदीर्घ कालावधीपासून बुलडाणा पोलीस दलाला नवीन वाहनांची आवश्यकता होती. त्यानुषंगाने ही वाहने पोलीस दलातील मोटार परिवहन विभागास मिळाली आहेत. परिणामी आता कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास वेळेत घटनास्थळी पोहोचणे पोलिसांना शक्य होणार आहे. दरम्यान, ही ३५ वाहने पोलीस दलास मिळाल्यामुळे आता पोलीस दलातील वाहनांची एकूण संख्या ३०४ झाली आहे. दरम्यान, यातील काही वाहने ही बरीच जुनी झाली होती. त्यामुळे राज्यात क्षेत्रफळाच्या दृष्टीने तिसरा मोठा जिल्हा असलेल्या व तब्बल ३३ पोलीस स्टेशन असलेल्या बुलडाणा जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी सांभाळताना मनुष्यबळाच्या कमतरतेसोबतच वेळीच घटनास्थळी पोहोचण्यास पोलीस दलाला समस्यांना सामोरे जावे लागत होते. जिल्हा नियोजन समितीअंतर्गत एक कोटी २५ लाख २५ हजार रुपयांचा निधी पोलीस दलास उपलब्ध करून देण्यात आला आहे. पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या हस्ते या वाहनांचे लोकार्पण १३ एप्रिल रोजी करण्यात आले.
बुलडाणा पोलिसांचे दळणवळण होणार गतिमान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2021 11:53 AM