बुलडाणा: पोलिस दलाला मिळाणारे शासकीय अनुदानाचा योग्य प्रकारे व नियोजनपूर्वक विनियोग केल्याने बुलडाणा जिल्हा राज्यात अव्वल आला आहे. दरम्यान, त्यानुषंगाने राज्यात प्रथमच दिला जाणारा उत्कृष्ट प्रशासक (जिल्हा) हा पुरस्कार ही बुलडाणा जिल्ह्याला मिळाला आहे. दरम्यान, या निमित्त जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ यांना पोलिस महासंचालक दत्ता पडसळगीकर यांच्या हस्ते प्रमाणपत्र व चषक देऊन गौरविण्यात आले आहे.नागपूर येथे वरिष्ठ पोलिस अधिकार्यांच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत हा पुरस्कार बुलडाणा जिल्ह्याला प्रदान करण्यात आला असल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. विशेष म्हणजे जीआयबेस स्ट्रेटेजिक सपोर्ट सिस्टीमचा खुबीने वापर करत ज्याच्या त्या महिन्यात प्राप्त निधी खर्च करून त्याच्या विनियोगाची देयकेही निर्धारित वेळेत सबमीट केल्या गेले आहेत. त्यामुळे बुलडाणा जिल्हा पोलिस दलाला एक आर्थिक शिस्त लागली असून त्याचाच हा गौरव करण्यात आला असल्याचे डॉ. दिलीप पाटील भुजबळ म्हणाले. २०१७-१८ या वर्षासाठीचा हा पुरस्कार बुलडाणा पोलिस दलाला मिळाला आहे. दरम्यान, या मुळे बुलडाणा जिल्ह्याला मिळालेले शासकीय अनुदानसुद्धा हे योग्य पद्धतीने खर्च होऊन ते परत जाण्याची नामुष्की आली नाही. त्यामुळे राज्यात बुलडाणा जिल्हा अव्वल ठरला आहे.कार्यालयीन कामकाज, वीज, दुरध्वनी, इंधन खर्च, प्रवास खर्च, आहार भत्ता, व्यावसायिक सेवा, पीसीपीआर (छोटी बांधकामाची कामे) तथा राज्य शासनाकडून मिळणारा सिक्रेट फन्ड बुलडाणा पोलिस दलातील अकाऊंट विभागाने जिल्हा पोलिस अधीक्षकांच्या मार्गदर्शनामध्ये परिणामकारकपणे विनियोग केला. त्यामुळे उत्कृष्ट अर्थसंकल्पीय विनियोगाबद्दल हा पुरस्कार मिळाला आहे. मार्च एन्डला वेळेवर होणारी धावपळ टाळून प्रसंगी परत जाणारा निधी रोखण्यास त्यामुळे मदत मिळाली असल्याचे जिल्हा पोलिस अधीक्षक म्हणाले. याअंतर्गत जालना जिल्ह्यानेही पोलिस कल्याण निधीचा सुयोग्य वापर केल्याने पोलिस कल्याण निधीचे पारितोषिक जालना जिल्ह्याला मिळालेले आहे. पुढील काळासाठीही जिल्हा पोलिस अधीक्षकांनी निधी विनियोगाच्यादृष्टीने उत्कृष्ट नियोजन केले आहे. त्यामुळे उत्कृष्ट प्रशासक (जिल्हा) हा फिरता चषक पुढील आर्थिक वर्षात आपल्याकडेच ठेवण्याचा मनोदयही त्यांनी व्यक्त केला.
आॅगस्ट २०१६ पासून उपक्रमास प्रारंभ प्रशासन विभागाच्या अपर पोलिस महासंचलाक प्रज्ञा सरवदे यांनी प्रामुख्याने ही संकल्पना प्रत्यक्षात उतरवली असून आॅगस्ट २०१६ मध्ये यास प्रारंभ झाला. यामध्ये जिल्हा पोलिस दलाला मिळणारा निधी थेट बीडीएसवर वळता करण्यात येतो. दरमहा लागणारा खर्चाची देयके वेळेत व नियोजनबद्ध पद्धतीने यात तयार केल्यामुळे बुलडाणा अव्वल ठरले आहे.