बुलडाणा : खडकपूर्णा प्रकल्पातील उपसा सिंचन योजनांना सौरउर्जेची वीज!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2017 12:46 AM2017-12-15T00:46:58+5:302017-12-15T00:47:20+5:30
खडकपूर्णाच्या सर्वच उपसा सिंचन योजना सौरउर्जेवर चालविण्यात यावेत, अशी मागणी सिंदखेडराजा आमदार डॉ.शशिकांत खेडेकर यांनी केली असता, त्यास ऊर्जामंत्री ना.चंद्रशेखर बावनकुळे यांनी मूक संमती दिली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चिखली : महाराष्ट्रातील अनेक ठिकाणच्या उपसा सिंचन योजना विद्युत बिल न भरल्यामुळे बंद पडलेल्या आहेत. असा प्रकार खडकपूर्णा प्रकल्पावरील उपसा सिंचनाच्या बाबतीत घडण्याची शक्यता पाहता, या प्रकल्पाच्या माध्यमातून कायमच शेतकरी हित जोपासले जावे व उपसा सिंचन योजना निरंतर सुरू राहावी, यासाठी खडकपूर्णाच्या सर्वच उपसा सिंचन योजना सौरउर्जेवर चालविण्यात यावेत, अशी मागणी सिंदखेडराजा आमदार डॉ. शशिकांत खेडेकर यांनी केली असता, त्यास ऊर्जामंत्री ना.चंद्रशेखर बावनकुळे यांनी मूक संमती दिली आहे.
महाराष्ट्र विधानसभा नियम २९३ अन्वये आणलेल्या प्रस्तावावर झालेल्या चर्चेत आ.डॉ.शशिकांत खेडेकर यांनी सहभाग घेत खडकपूर्णा प्रकल्पातील उपसा सिंचन योजना सौरउर्जेवर चालविण्यासह खडकपूर्णा प्रकल्पाला पर्यटन स्थळाचा दर्जा देण्यात यावा, अशी मागणी केली होती. या चर्चेदरम्यान आ.डॉ.शशिकांत खेडेकर यांनी खडकपूर्णा प्रकल्पाचे २४ हजार ८६४ हेक्टर सिंचन लाभक्षेत्र आहे; परंतु या लाभक्षेत्राबाहेर खडकपूर्णा प्रकल्पातील पाण्याची चोरी होत आहे, मराठवाड्यातील अनेक शेतकर्यांनी खडकपूर्णा प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्राजवळ गुंठाभर जमीन घेऊन तेथे विहिरी खोदून त्यातून अवैध कनेक्शनद्वारे १५-२0 किमी पाइप-लाइन टाकून लाभक्षेत्राच्या बाहेर पाण्याची चोरी चालविली आहे. त्यामुळे लाभक्षेत्रातील शेतकर्यांना त्यांच्या हक्काच्या पाण्यापासून वंचित राहावे लागत असून, त्यांच्या पिकांचे नुकसान होत आहे. खडकपूर्णातील पाणी चोरी तातडीने थांबवावी, तसेच खडकपूर्णा प्रकल्पाची साठवण क्षमता १६0 दलघमी आहे. त्यापैकी सुमारे ६७ दलघमी मृत साठा आहे. प्रकल्पाचा मृतसाठा जादा असल्याने शेतकर्यांना त्यातून पाणी दिल्या जात नाही व तेथेही शेतकर्यांवर अन्याय होत असल्याने ४१ टक्के असलेला मृतसाठा कमी करण्यात यावा, तसेच हा प्रकल्प ३0 जून २0१८ पर्यंत पूर्णत्वास नेण्याचा शासनाचा माणस असल्याने प्रकल्प पूर्णत्वास नेण्यापूर्वी प्रकल्पग्रस्तांचे, उर्वरित घरांचे, शेताचे, फळबागांचे, पाटाच्या कामाचा मोबदला, पुनर्वसित १८ गावांच्या मूलभूत सुविधांपैकी प्रलंबित असलेली कामे त्वरित पूर्ण करण्यात यावी, हे करीत असताना पुनर्वसन झाल्यामुळे गावाचे भौगोलिक क्षेत्र वाढले आहे. अंतर्गत रस्त्यांची लांबीसुद्धा वाढली आहे. खडकपूर्णा प्रकल्पाच्या बॅक वॉटरमुळे ज्याठिकाणी शेतरस्ते नाही, असे शेतरस्ते तसेच अंतर्गत रस्त्यांच्या डांबरीकरणासाठी चतुर्थ सुधारित प्रशासकीय मान्यतामध्ये समावेश करावा, यासह मेक इन महाराष्ट्र अंतर्गत देऊळगावराजा येथे मंजूर झालेला सिड हब कार्यान्वित करण्यात यावा, रानडुक्कर, रोही व हरीण आदी प्राण्यांकडून होणार्या पिकांच्या नुकसानीचा मोबदला तातडीने देण्यासह या वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करावा, अटल सौर कृषी पंप योजना सुरू ठेवण्यात यावी, आदी मागण्या आ.डॉ.शशिकांत खेडेकर यांनी सभागृहात लावून धरल्या आहेत.