देशपातळीवरील ‘मी सावरकर’ वक्तृत्व स्पर्धेत चमकले बुलडाण्याचे नाव!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2021 05:06 AM2021-02-28T05:06:37+5:302021-02-28T05:06:37+5:30
बुलडाणा : देशपातळीवर पार पडलेल्या ‘मी सावरकर’ वक्तृव स्पर्धेत अमेरिकेसह ८० ठिकाणच्या स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. या ऑनलाईन स्पर्धेत ...
बुलडाणा : देशपातळीवर पार पडलेल्या ‘मी सावरकर’ वक्तृव स्पर्धेत अमेरिकेसह ८० ठिकाणच्या स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. या ऑनलाईन स्पर्धेत बुलडाण्याच्या रचना गुळवे या आठवीच्या विद्यार्थिनीने आपल्या वक्तृत्व शैलीतून सावरकरांविषयी बोलताना उत्कृष्ट विचार मांडले. त्यामुळे देशपातळीवरील या स्पर्धेत बुलडाण्याचे नाव चमकले. यामध्ये प्रथम क्रमांक मुंबई व द्वितीय क्रमांक बुलडाण्याच्या रचनाने पटकाविला.
‘मी सावरकर’ एक अभिनव वक्तृत्व स्पर्धा मागील चार वर्षांपासून पुणे येथील स्वानंद चॅरिटेबल ट्रस्ट, डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या वतीने घेण्यात येते. स्वातंत्र्यवीर सावरकर स्मृतिदिनानिमित्त ही स्पर्धा घेण्यात येते. सावरकर हे विज्ञाननिष्ठ आणि नवीन तंत्रज्ञानाचे पुरस्कर्ते असल्या कारणाने ही स्पर्धा ऑनलाईनच घेण्यात येते. या स्पर्धेला सर्वच गटात चांगला प्रतिसाद मिळाला होता. परदेशातूनही काहीजण यात सहभागी झाले होते. वक्तृत्व स्पर्धेच्या सादरीकरणामध्ये विविध विषयांबरोबर काव्यनिरुपणसुद्धा समाविष्ट करण्यात आले होते. स्पर्धेच्या भाषणासाठी सात मिनिटांचा कालावधी देण्यात आला होता. स्पर्धा मराठी, हिंदी आणि इंग्रजी या माध्यमांमधून होती. या स्पर्धेचा निकाल सावरकरांच्या स्मृतिदिनाच्या पूर्वसंध्येला २५ फेब्रुवारी रोजी जाहीर करण्यात आला. गट क्रमांक एकमधून इयत्ता पाचवी ते आठवीमधून बुलडाणा येथील रचना योगेंद्र गुळवे या विद्यार्थिनीने सावरकर आणि नेताजी सुभाषचंद्र बोस या विषयावर सादरीकरण केले. त्यामध्ये या विद्यार्थिनीने द्वितीय क्रमांक मिळविला आहे. प्रथम क्रमांक मुंबई येथील आयुषी पवार व सांगली येथील अनिरुद्ध कुलकर्णी यांना विभागून देण्यात आला.
६०० पेक्षा अधिक स्पर्धकांचा होता सहभाग
‘मी सावरकर’ एक अभिनव वक्तृत्व स्पर्धेत देशभरातून कुठल्याही स्पर्धकाला सहभागी होण्याची संधी देण्यात येते. विशेष म्हणजे अमेरिका, बहरीनसह भारताच्या ८० ठिकाणांमधून स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेत ६०० पेक्षा अधिक स्पर्धकांचा सहभाग होता.
पारितोषिक समारंभ लांबणीवर
रोख रक्कम, स्मृतिचिन्ह आणि प्रशस्तीपत्रक असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ २७ फेब्रुवारी २०२१ रोजी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत होणार होता. परंतु, सध्याच्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून अनेक कार्यक्रमांना स्थगिती देण्यात आली आहे. त्यामुळे हा कार्यक्रम तूर्तास पुढे ढकलण्यात आला आहे.