लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : महापूरामुळे कोल्हापुर आणि सांगली भागामध्ये जिवीत आणि वित्तहानी झालेली आहे. देशभरातून सांगली-कोल्हापूरकडे मदतीचा ओघ वाहत असताना पूर ग्रस्तांच्या मदतीसाठी बुलडाणेकरही सरसावले आहेत. ११ आॅगस्ट रोजी ‘आम्ही बुलडाणेकर’कडून मदत रॅली काढून पूर ग्रस्तांसाठी आर्थिक मदत जमा केली.महापूरामुळे कोल्हापुर आणि सांगली भागामध्ये मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून तिथल्या लोकांना उभे राहणे कठीण झाले आहे. या ओढावलेल्या संकटातून त्यांना सावरण्याची मोठी गरज आहे. यापार्श्वभूमीवर माणसूकीच्या या प्रवाहात बुलडाणेकरांचेही योगदान असावे या उद्देश्याने ११ आॅगस्ट रोजी शहरात मदत रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीत अखिल भारतीय काँग्रेसचे सचिव आ. हर्षवर्धन सपकाळ यांच्यासह अनेक सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मंडळी सहभागी झाले होते. कोण मदत करतोय, यापेक्षा काय मदत केली जात आहे, हे अधिक महत्त्वाचे असल्याने पक्ष, संघटना, व्यक्तीविशेष यांची भिन्नता संपवून ‘आम्ही बुलडाणेकर’ या एकाच नावाने ही मदत पाठविल्या जाणार आहे. ही मदत फेरी संगम चौकातून जयस्तंभ चौक, बाजार लाईन, जनता चौक, कारंजा चौक, जिल्हाधिकारी कार्यालय अशा मार्गाने काढली गेली. बुलडाणेकरांनी आपल्या संवेदनशीलतेचा परिचय नेहमी दिला आहे. रडणाऱ्यांचे अश्रू पुसण्यापेक्षा मोठे सत्कर्म असू शकत नाही. कोल्हापूर-सांगलीमध्ये अशी अनेक गावे आहेत, ज्यांचे रुपांतर बेटांमध्ये झाले आहे. याठिकाणी पूराच्या वेदनांना मदतीच्या संवेदनांनी संपविण्यासाठी मदतीशिवाय दूसरा पर्याय नाही. या उपक्रमात मोठ्या संख्येत सहभागी होऊन सढळ हाताने पूरग्रस्तांना मदत करावी, असे आवाहन आम्ही बुलडाणेकरांच्या वतीने करण्यात आले आहे.
आरोग्य विभागाकडून वैद्यकिय मदतबुलडाणा: पूरग्रस्तांसाठीजिल्हा परिषद बुलडाणा आरोग्य विभाग व जिल्हा सामान्य रुग्णालय बुलडाणा यांच्या वतीने ११ आॅगस्ट रोजी औषधांची मदत शासकिय वाहनव्दारे ११ आॅगस्ट रोजी पाठविण्यात आली. सातारा जिल्ह्यातील पूरग्रस्त भागातील जनतेसाठी कामगार,विमुक्त जाती, भटक्या जमाती तथा पालक मंत्री डॉ. संजय कुटे, जिल्हाधिकारी डॉ. निरुपमा डांगे, मुख्यकार्यकारी अधिकारी षण्मुखराजन एस., जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बाळकृष्ण कांबळे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रेमचंद पंडीत, डॉ. राजेंद्र सांगळे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य विभाग जिल्हा परिषद बुलडाणा व जिल्हा सामान्य रुग्णालय बुलडाणा यांच्या वतीने औषधांची मदत शासकिय वाहनव्दारे ११ आॅगस्ट रोजी पाठविण्यात आली. ही वैद्यकिय मदत सातारा जिल्ह्यातील उपजिल्हा रफग्णालय कराड येथे देण्यात येणार आहे. दरम्यान, या वाहनास प्र.जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजेंद्र सांगळे यांनी हिरवी झेंडी दाखवुन रवाना केले. याप्रसंगी जिल्हा माता बालसंगोपन अधिकारी डॉ. रविंद्र गोफण, वैद्यकिय अधिकारी डॉ. साळोख, अजय बाहेकर, जगदीश डोडीया, जे.टी. पाटील, गोपाल भुयारकर, विनोद तुपकर, अमोल गिरी, देशमुख व इतर आरोग्य कर्मचारी हजर होते.