Buldhana: काथरगाव पिंप्री येथील १५० नागरिक पुरात अडकले, ग्रामस्थांनी घराच्या छतावर घेतला आसरा
By विवेक चांदुरकर | Published: July 22, 2023 03:00 PM2023-07-22T15:00:05+5:302023-07-22T15:00:49+5:30
Buldhana Flood Update: मुसळधार पावसामुळे तालुक्यात पूर परिस्थिती निर्माण झाल्याने काथरगाव पिंप्री येथील १५० नागरिक शनिवारी सकाळी पुरात अडकले. त्यांना बाहेर काढण्यासाठी एनडीआरएफच्या पथकाला पाचारण करण्यात आले आहे.
- विवेक चांदूरकर
संग्रामपूर : मुसळधार पावसामुळे तालुक्यात पूर परिस्थिती निर्माण झाल्याने काथरगाव पिंप्री येथील १५० नागरिक शनिवारी सकाळी पुरात अडकले. त्यांना बाहेर काढण्यासाठी एनडीआरएफच्या पथकाला पाचारण करण्यात आले आहे.
काथरगाव पिंप्री येथे लेंडी व पांडव नदीचा संगम आहे. नदीला शनिवारी मोठ्या प्रमाणात पूर आला. नदी काठावरील ३० घरांच्या वस्तीला पुराने वेढा घातल्याने सुमारे १५० नागरिक अडकले आहे. या वस्तीच्या एका बाजूला नदी तर दुसऱ्या बाजूला नाला असल्याने पूर्ण वस्तीला पुराचा वेढा पडला आहे. या वस्तीतील नागरिकांनी एका घराच्या छतावर आश्रय घेतल्याची माहिती ग्रामस्थ गणेश टापरे यांनी दिली. पुरातून त्यांची सुखरूप सुटका करण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती निवारण पथकाला पाचारण करण्यात आले आहे. लवकरच बचाव कार्याला सुरुवात होणार आहे. येथे घरात पाणी शिरल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती आहे.
नदीला मोठ्या प्रमाणात पूर आल्याने १५० नागरिक अडकलेले आहेत. पुरातून सुखरूप बाहेर काढण्यासाठी एनडीआरएफच्या पथकाला पाचारण करण्यात आले आहे. काही वेळातच पथक दाखल होणार आहे. पुरात अडकलेले सर्व नागरिक सुखरूप आहेत.
- सुवर्णा गणेश टापरे
(सरपंच, पिंप्री काथरगाव, ता. संग्रामपूर)
काथरगाव पिंप्री येथे एनडीआरएफच्या पथकाला पाचारण करण्यात आले आहे. घटनास्थळावर लवकरच पथक दाखल होणार असून अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यात येणार आहे.
- योगेश्वर टोंपे
(तहसीलदार, संग्रामपूर)