- अनिल गवई खामगाव - शेगाव खामगाव पालखी मार्गासोबतच टेंभुर्णा ते माक्ताकोक्तापर्यंत नवीन महामार्गावर लावण्यात आलेले दोनशे ते अडीचशे रंगीबेरंगी ध्वज राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि पोलिस प्रशासनाने संयुक्त कारवाई करून हटविले. या कारवाईमुळे खामगाव आणि परिसरातील ध्वज लावण्याच्या स्पर्धेला लगाम बसणार असल्याची चर्चा आहे.
खामगाव शेगाव रोडवरील नवीन उड्डाण पुलावरील पथदिवे तसेच शेगाव नाका ते जयपूर लांडे फाट्यापर्यंतच्या रस्त्यावरील पथदिवे आणि विद्युत खांबावर रंगीबेरंगी ध्वज लावण्यात आले होते. एकाच खांबावर विविध रंगीबेरंगी ध्वज लावण्यात येत असल्याने या मार्गावर गत काही दिवसांत ध्वज लावण्याची स्पर्धाच रंगली होती. दरम्यान, शनिवारी रात्री जेसीबीच्या साहाय्याने पोलिस बंदोबस्तात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून सर्वच ध्वज काढण्यात आले. काढण्यात आलेले ध्वज जप्त करण्यात आले. दरम्यान लावणाऱ्यांविरोधात ‘दी महाराष्ट्र प्रिव्हेन्शन ऑफ डिफेसमेंट ऑफ प्रॉपर्टी ॲक्ट’नुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
१५ लाखांचे ध्वज काढलेप्रशासनाने संयुक्त कारवाई करून शनिवारी रात्री दरम्यान, तब्बल १५ लक्ष रुपये किमतीचे मोठे ध्वज आणि नॉयलाॅन दोरी जप्त केली. एकाच खांबावर तीनपेक्षा अधिक ध्वज लावण्यात आले होते. यावेळी चोख पोलिस बंदोबस्त लावण्यात आला होता.
राष्ट्रीय महामार्गावरील पथदिव्यांवर मोठमोठे लावलेले तब्बल अडीचशे ध्वज जेसीबीच्या साहाय्याने काढण्यात आले. कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही, याची काळजी घेत ध्वज काढण्यात आले. जवळपास २० लक्ष रुपये किमतीचा कापड, दोरी आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले.
- अशोक थोरातअपर पोलिस अधीक्षक, खामगाव.