Buldhana: सातपुड्यात ढगफुटी: जळगाव शहरासह तालुका जलमय, शेकडो घरे वाहून गेली, शेतीचे नुकसान
By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2023 02:17 PM2023-07-22T14:17:51+5:302023-07-22T14:18:35+5:30
Buldhana: शनिवारी पहाटे ५ वाजतापासून सातपुडा पर्वत राजीसह जळगाव तालुक्यात ढगफुटी सदृश्य पावसाने नदी नाल्यांना प्रचंड पूर आला. या पुरामुळे नदीकाठची घरे वाहून गेली तर अनेक घरात पाणी घुसले.
- नानासाहेब कांडलकर
जळगाव जामोद (बुलढाणा) - शनिवारी पहाटे ५ वाजतापासून सातपुडा पर्वत राजीसह जळगाव तालुक्यात ढगफुटी सदृश्य पावसाने नदी नाल्यांना प्रचंड पूर आला. या पुरामुळे नदीकाठची घरे वाहून गेली तर अनेक घरात पाणी घुसले. नदीकाठची हजारो हेक्टर जमिनी खरडून गेली. पूर्णा नदीला पूर आल्याने नांदुरा- जळगाव रस्ता बंद झाला आहे.
मुख्य जळगाव व जळगाव खुर्द या दोन नगरातून वाहणाऱ्या पद्मावती नदीला प्रचंड पूर आल्याने भीमनगर, ताटीपुरा, तबिलपुरा, रुपलाल नगर, नाव्हीपुरा, तलावपुरा, माळी खेल आदी भाग हा जलमय झाला होता. या पद्मावती नदीकाठच्या दोन्ही भागातील घरे वाहून गेली आणि यामध्ये काही जनावरे सुद्धा मृत्युमुखी पडली. अचानक पूर आल्याने नागरिकांची मोठी धावपळ झाली. फक्त आपला जीव वाचविण्या पलीकडे त्यांच्याकडे कोणताही पर्याय शिल्लक राहिला नव्हता.
तर जळगाव तालुक्यातील आसलगाव, सुनगाव, जामोद, वडगाव पाटण, इलोरा, निंभोरा, येनगाव, वडशिंगी, धानोरा, खेर्डा खुर्द व खेर्डा बुद्रुक आदी गावांमध्ये नदी नाल्यांचे पाणी घुसले. त्यामुळे घरांची फार मोठी हानी झाली. काही ठिकाणी जणू जलमय स्थिती निर्माण झाली होती. तब्बल पाच तास धुवाधार अखंड पाऊस सुरू होता.
श्रीसंत सखाराम महाराज संस्थान इलोरा येथेही पाणी घुसले. संस्थानचे मोठे नुकसान झाले. संस्थानच्या अनेक वस्तू पुरामध्ये वाहून गेल्यात. गत पंचवीस वर्षाचा एवढा महापूर आम्ही बघितला नाही अशी प्रतिक्रिया वयस्कर नागरिकांनी दिली. शनिवारच्या अतिवृष्टीने व महापुराने तालुक्यातील एकही गाव असे राहिले नाही की जे जलमय झाले नाही. नागरिक भयभीत झाले होते. आमदार डॉ. संजय कुटे हे त्वरित सर्व गावांना भेटी देण्याच्या दृष्टिकोनातून आणि एकूणच परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी फिरत होते. त्यांनी सर्व नागरिकांना धीर देण्याचा प्रयत्न केला. एकूणच नुकसानीचा आढावा घेतल्यानंतर शासनाकडून योग्य ती मदत संबंधितांना दिल्या जाईल असेही त्यांनी नागरिकांना आश्वस्त केले.