बुलडाणा जिल्हा गारठला; पिकांवर हवामानाचा दुहेरी परिणाम!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2017 11:48 PM2017-12-05T23:48:44+5:302017-12-05T23:49:53+5:30

बुलडाणा जिल्ह्यात दोन दिवसांपासून हवामानात बदल झाला असून, वाढती थंडी गहू पिकासाठी पोषक  ठरत आहे; मात्र थंडीबरोबरच ढगाळ वातावरणही निर्माण झाल्याने तूर व हरभरा पिकांवर  किडीच्या प्रादुर्भावाचा धोका वाढला आहे.

Buldhana district guerrilla; Due to double weather results on crops! | बुलडाणा जिल्हा गारठला; पिकांवर हवामानाचा दुहेरी परिणाम!

बुलडाणा जिल्हा गारठला; पिकांवर हवामानाचा दुहेरी परिणाम!

Next
ठळक मुद्देगव्हाला पोषक; तर तूर, हरभरा धोक्यात!

ब्रह्मनंद जाधव । 
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा :  जिल्ह्याच्या सरासरी रब्बी क्षेत्रापैकी ९५ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे. दरम्यान,  बुलडाणा जिल्ह्यात दोन दिवसांपासून  हवामानात बदल झाला असून, वाढती थंडी गहू पिकासाठी पोषक  ठरत आहे; मात्र थंडीबरोबरच ढगाळ वातावरणही निर्माण झाल्याने तूर व हरभरा पिकांवर  किडीच्या प्रादुर्भावाचा धोका वाढला आहे. त्यामुळे रब्बी पिकांवर थंडी व ढगाळ हवामानाचा  दुहेरी परिणाम जाणवत आहे.  
जिल्ह्यात १ लाख ३४ हजार १९४ हेक्टर क्षेत्रापैकी १ लाख २७ हजार ९0७ हेक्टर क्षेत्रावर  रब्बीची पेरणी झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ९५ टक्के क्षेत्रावर रब्बीची पेरणी झालेली आहे.  त्यात गहू पिकाचे क्षेत्र १५ हजार ५00 हेक्टर व हरभरा पिकाचे क्षेत्र ९१ हजार १३६ हेक्टर  आहे. सध्या गहू व हरभरा पीक चांगले बहरले असून,  तूरही शेंगांनी लदबदली आहे. दरम्यान,  जिल्ह्यात होत असलेल्या वातावरणातील बदलांचा परिणाम पिकांवर जाणवत आहे.  सध्या  थंडीचे प्रमाण वाढल्याने  ही थंडी गहू पिकासाठी अत्यंत फायद्याची ठरत आहे. गहू पिकास रात्री  थंड आणि दिवसा कोरडे हवामान मानवते. गहू पिकाच्या चांगल्या उत्पन्नासाठी गव्हाला जास्तीत  जास्त थंडी मिळणे आवश्यक असते; परंतु रब्बी हवामानाच्या दिवसांमध्ये जिल्ह्यात दरवर्षी  थंडीचा कालावधी पाहिजे तेवढय़ा प्रमाणात जाणवत नाही. तसेच रात्रीच्या तापमानातसुद्धा बरीच  तफावत आढळून येते. पीकवाढीच्या काळात अचानक तापमानात वाढ झाली तर पीक लवकर  फुलावर येते व पर्यायाने उत्पन्नात घट होते. सध्या गहू पिकाला जवळपास १५ दिवस झाले असून,  पाणी देण्याच्या दोन पाळ्या झाल्या आहेत. आता जिल्ह्यात वाढलेली थंडी गहू पिकासाठी पोषक  ठरत आहे. यामुळे गहू पीक वाढण्यास मदत होते. वाढत्या थंडीमुळे गहू उत्पादकांना दिलासा  मिळाला आहे; मात्र थंडीसोबतच जिल्ह्यात ढगाळ वातावरणही निर्माण झाल्याने तूर व हरभरा  िपकावर किडीचा प्रादुर्भाव वाढण्याची दाट शक्यता दिसून येत आहे. 

२0 अंश सेल्सिअसपर्यंत तापमान उपयुक्त 
गहू पीक वाढीसाठी सुरुवातीच्या काळात १0 ते २0 अंश सेल्सिअस पर्यंतचे तापमान उपयुक्त ठर ते. सध्या जिल्ह्यात २0 ते २६ अंश सेल्सिअसपर्यंत तापमान राहत आहे. त्यामुळे या तापमानात  गहू बियाण्याची उगवण चांगली होत आहे; तसेच बागायती क्षेत्रावर आतापर्यंत झालेल्या गहू  पेरणीला थंडीचा जास्तीत जास्त लाभ मिळत आहे; मात्र डिसेंबर महिन्याच्या १५ तारखेनंतर  उशिरा किंवा अति उशिरा पेरणी केली असता, उत्पन्नात घट येऊ शकते. उशिरा पेरणी केलेल्या  गहू पिकास थंड हवामानाचा कालावधी फारच कमी मिळतो, त्यामुळे फुटव्यांची व ओंबीतील  दाण्यांची संख्या कमी होऊन उत्पन्नात घट येते.

तूर, हरभर्‍याचे नुकसान 
ढगाळ वातावरणामुळे तूर व हरभरा पिकावर किडीचा प्रादुर्भाव वाढत आहे. तुरीचे पीक सध्या  शेंगा भरण्याच्या अवस्थेत असून, त्यावर शेंगा पोखरणार्‍या अळीने हल्ला केला आहे, तर हरभरा  पिकावरसुद्धा घाटे अळीचा प्रादुर्भाव जाणवत आहे. ढगाळ वातावरणात किडीचा प्रादुर्भाव  नियंत्रणात ठेवणे शेतकर्‍यांसाठी अवघड झाले आहे. त्यामुळे तूर, हरभर पिकाचे नुकसान होत  आहे. 

बदलत्या हवामानाचा पिकांवर परिणाम होत आहे. थंडी सुटल्याने गहू पिकासाठी पोषण वातावरण  निर्माण झाले आहे; मात्र थंडीबरोबरच ढगाळ वातावरणही असल्याने तूर व हरभरा पिकावर  किडीचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. तेव्हा पिकांवरील कीड नियंत्रणासाठी वेळीच उ पाययोजना कराव्या.
- डॉ. सी.पी.जायभाये,
शास्त्रज्ञ, कृषी संशोधक केंद्र, बुलडाणा.

Web Title: Buldhana district guerrilla; Due to double weather results on crops!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :agricultureशेती