वन्य प्राण्यांच्या हल्ल्याबाबत बुलडाणा जिल्हा संवेदनशील; १६ ठिकाणे संवेदनशील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2018 05:12 PM2018-03-10T17:12:58+5:302018-03-10T17:12:58+5:30
बुलडाणा : अलिकडील काळात गाव आणि जंगलातील अंतर कमी झाल्यामुळे वन्यश्वापदे आणि मानव संघर्षामध्ये जिल्ह्यात वाढ झाली असून जिल्ह्यातील तब्बल १६ ठिकाणे ही वन्य श्वापदांच्या हल्ल्याच्या दृष्टीने संवेदनशील बनली आहे.
- नीलेश जोशी
बुलडाणा : अलिकडील काळात गाव आणि जंगलातील अंतर कमी झाल्यामुळे वन्यश्वापदे आणि मानव संघर्षामध्ये जिल्ह्यात वाढ झाली असून जिल्ह्यातील तब्बल १६ ठिकाणे ही वन्य श्वापदांच्या हल्ल्याच्या दृष्टीने संवेदनशील बनली आहे. त्या पार्श्वभूमीवर वनविभागाने असा संघर्ष रोखण्यासाठी पथके सज्ज केली आहेत.
जिल्ह्याचे नऊ टक्के क्षेत्र वनांनी व्यापलेले असतानाच त्याची घनता ही सुमारे ०.४ टक्क्यांच्या आसपास आली आहे. एक हजार १६६ चौरस किमी क्षेत्र हे जंगलांनी व्यापलेले आहे. त्यातच अवैध वृक्षतोड, चराईची वाढती संख्या पाहता मानव वन्यश्वापदे हा संघर्ष वाढत आहे. जिल्ह्याचा गेल्या १७ वर्षाचा इतिहास पाहता १०० पेक्षा अधिक व्यक्तींवर वन्यश्वापदांनी हल्ले केल्याच्या घटना घडल्या असून तब्बल ४२ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे यावर्षी वनविभाग असे संघर्ष रोखण्यासाठी प्रादेशिक आणि वन्यजीव विभाग सज्ज झाला आहे.
जिल्ह्यात ज्ञानगंगा, अंबाबरवा आणि राज्यातील सर्वात छोटे पक्षी अभयारण्य लोणार सरोवर परिसरात शेड्यूल वन मधील बिबट्याचा वावर वाढला आहे. पशुधनासह मानवावरही हल्ले होण्याच्या घटना वाढल्या आहेत. त्यानुषंगाने वनविभागाने जुन्या अनुभवावरून सतर्कता बाळगण्याची भूमिका घेतली आहे. दोन दशकांचा विचार करता बुलडाणा जिल्ह्यात दरवर्षी सरासरी तीन ते चार व्यक्तींचा मृत्यू अशा घटनात होत असल्याचे स्पष्ट होते. त्यामुळे मानवी हस्तक्षेप जिल्ह्यातील जंगलात वाढत असल्याचे चित्र आहे. त्यातच गेल्या ३०० वर्षाच्या काळात बिबट्याने त्याची आश्रयस्थाने बदलण्यास सुरूवात केली आहे. त्याचाही परिणाम यावर होत आहे. वनांची घनताही कमी होत असून वन जमीनीवर अतिक्रमण वाढण्यासोबतच वृक्षतोड, गुरे चराईसाठी वनालगतच्या गावातील नागरिक जंगलात जात असल्याने हा संघर्ष येत्या काळात वाढण्याची चिन्हे आहेत.
हे पट्टे आहेत संवेदनशील
बुलडाणा जिल्ह्यात वन्यश्वापदे आणि मानव संघर्षाच्या दृष्टीने मोताळा तालुक्यातील नेहरूनगर, धामणगाव बढे, बुलडाणा तालुक्यातील पाडळी, गिरडा, गुम्मी धाड, मेहकरमधील घाटबोरी, चिखलीमधील ढासाळा, अंचरवाडी, इसरूळ, खामगाव तालुक्यातील वरणा, मांडणी, केंद्री, काळगाव,निमकव्हाळा, अंबाबरवा अभयारण्यालगतचा भाग, जळगाव जामोद तालुक्यातील काही भाग प्रामुख्यान संवेदनशील गणला जातो. याच भागत पूर्वी संघर्ष झालेले आहेत.