- अनिल गवई खामगाव - वारस महिला जिवंत असतानाही सहा आरोपींनी संगनमत करून बनावट आणि खोटे दस्तवेज तयार केले. त्यानंतर उपनिबंधक कार्यालयात बनावट महिला उभी करून शेती हडपल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आला. या प्रकरणी पिडीतेच्या तक्रारीनंतर न्यायालयाच्या आदेशाने खामगाव शहर पोलीसांनी सहा जणांविरोधात गुन्हा दाखल केला.
तक्रारीनुसार नांदुरा तालुक्यातील टाकरखेडा येथील ताईबाई रमेश जाधव (६०) यांच्या वडिलांच्या नावे भूमापन क्र ८० क्षेत्र १.२२ आर आणि गट नं ९३ क्षेत्रफळ १७ हेक्टर ६५ आर अशी जमीन आहे. या जमिनीचे महिलेच्या वडीलांच्या मृत्यूनंतर आरोपी क्रमांक १ असलेला ज्ञानदेव हिलालसिंग राजपूत आणि त्याची आई वारस होती. तशी सातबारामध्ये नोंदही होती. दरम्यान, तक्रारदार महिलेची आई देखील मृत झाल्याने वारस भाऊ तथा आरोपी क्रमांक हा एकमेव वारस होता. दरम्यान, तक्रारदार महिलेच्या गैरहजेरीत आरोपी क्रमांक २ विजय विठ्ठलदास चांडक रा. रोहणा याने आरोपी क्रमांक १ कडून २६ मे २००४ रोजी लिहून व नोंदवून घेतली. त्यानुसार दोन वेगवेगळ्या नोंदणी तक्रारकर्त्या महिलेच्या गैरहजेरीत त्रयस्त महिला हजर दाखवून बनावट दस्त नोंदणी व खरेदी खत तयार करण्यात आले. तसेच तक्रारदार महिलेचा अधिकार हडपून फसवणूक केल्याचा आरोप तक्रारीत केला. याप्रकरणी खामगाव न्यायालयाचे न्यायदंडाधीकारी एस.एन. भावसार प्रथम वर्ग कोर्ट नं १ यांच्या कलम १५६ (३) आदेशानुसार ज्ञानदेव हिलालसिंग राजपूत (४०), विजय विठ्ठलदास चांडक(४७), लाखन नारायणदास साहु (५०) रा. एम.आय.डी.सी. खामगाव, एकनाथ नामदेव रोठे (५०), निवृत्ती शंकर खंडारे (५५), सुनंदाबाई कीसन वावगे (५०) सर्व रा. राेहणा ता. खामगाव यांच्या विरोधात भादंवि कलम कलम ४२०, ४६५, ४७१, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला. पुढील पोउनि लबडे करीत आहेत.