‘रुर्बन’चा ‘सीजीएफ’ आराखडा ३० कोटी रुपयांच्या घरात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2020 01:59 PM2020-02-26T13:59:51+5:302020-02-26T13:59:57+5:30
३० कोटी रुपयांच्या विकास आराखड्यास राज्य शासनाच्या ग्राम विकास विभागाने मान्यता दिली.
- नीलेश जोशी
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: गेल्या दशकात ग्रामीण लोकसंख्येत १२ टक्के वाढ झाल्याच्या पार्श्वभूमीवर शहरी तथा ग्रामीण भागातील विकासाचा असमतोल दुर करण्यासाठी देशात राबविण्यात येणाऱ्या रुरअर्बन अभियानातर्गंत निवड झाल्या सुलतानपूर जिल्हा परिषद गटाच्या आर्थिक, सामाजिक व भौतिक विकासासाठी बनविण्यात आलेल्या ३० कोटी रुपयांच्या विकास आराखड्यास राज्य शासनाच्या ग्राम विकास विभागाने मान्यता दिली असून लवकरच केंद्र सरकारच्या मान्यतेसाठी याचा डिपीआर पाठविण्यात येणार आहे.
दरम्यान, सुलतानपूर जिल्हा परिषद गटातील १३ गावामध्ये आतापर्र्यंत २७ कोटी रुपयांची कामे करण्यात आली असून राज्य व केंद्र शासनाच्या विविध योजनांचे एकत्रीकरण करून ही कामे करण्यात आली आहेत. दरम्यान, ज्या विकास कामांना कुठल्याही अस्तित्वात असलेल्या योजनेतून निधी उपलब्ध होत नाही, अशा कामांसाठी श्यामा प्रसाद मुखर्जी रुरबन अभियानातंर्गत क्रिटीकल गॅप फंडींग (उणिवा निवारण निधी) अंतर्गत सुमारे ३० कोटी रुपयांचा वकास आराखडा तयार करून त्यास राज्य व केंद्राची मान्यता घेतून पायाभूत विकासाची कामे करण्यावर भर दिला जात आहे. त्यातंर्गतच सुलतानपूर जिल्हा परिषद गटातील १३ गावांच्या विकासाठी ३० कोटी रुपयांचा हा आराखडा बनविण्यात आला आहे.
त्यास राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाने ३० डिसेंबर रोजीच मान्यता दिली आहे. मात्र त्यात काही सुधारणा सुचविल्यामुळे अद्याप केंद्र शासनाच्या मान्यतेसाठी हा डिपीआर पाठविण्यात आलेला नाही. त्यात सुधारणा करून तो पाठविण्यात येणार आहे.
सर्जिक कॉटन युनीट प्रस्तावित
नव्या डिपीआरनुसार सुलतानपूर येथे सर्जिकल कॉटन निर्मितीसाठी एक युनीट प्रस्तावित करण्यात आले आहे. सोबतच अॅग्रो मॉल प्रस्तावीत असून सेंद्रीय शेतीच्या माध्यमातून रोजगार निर्मिती या गटातील १३ गावात कशी करता येईल, याला प्राधान्य देण्यात येणार आहे. दरम्यान, अस्तित्वात असेल्या केंद्र व राज्य शासनाच्या योजनांचे एकत्रीकरण करून या गटात पायाभूत सुविधा उपलब्ध करण्यासाठी जवळपास १२२ कोटी रुपयांचा कन्वहर्जन आराखडा आहे.
दोन मार्चला मुंबईत बैठक
येत्या दोन मार्च रोजी सीजीएफ अंतर्गतच्या ३० कोटी रुपयांच्या विकास आराखड्यासंदर्भात ग्रामविकास विभागच्या वतीने मुंबईत बांधकाम भवनामध्ये महत्त्वाची बैठक घेण्यात येत असून रुरअर्बन योजनेतंर्गत समाविष्ठ असलेल्या गाव समुहाच्या पायाभूत विकासासाठी आणखी काय करता येऊ शकते, याबाबत बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात येणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली.