- विवेक चांदूरकर खामगाव - शुक्रवारी रात्रीपासून शनिवारी सकाळपर्यंत खामगाव, जळगाव जामोद, संग्रामपूर तालुक्यात मुसळधार पाऊस कोसळला. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, एकलारा बानोदा येथील एक व्यक्ती केदार नदीच्या पुरात वाहून गेला. जळगाव जामोद व संग्रामपूर तालुक्यातील अनेक गावांचा संपर्क तुटला आहे.
बुधवारी जिल्ह्यातील मलकापूर, नांदुरा, जळगाव जामोद भागात अतिवृष्टी झाली. त्यानंतर पुन्हा शनिवारी सकाळी जोरदार पाऊस झाल्याने पिकांना चांगलाच फटका बसला आहे. एकलारा बानोदा परिसरात केदार नदीमध्ये मधुकर धुळे (५०) वाहून गेले. मधुकर धुळे त्यांच्या मुलासोबत शनिवारी सकाळी गायीचे दूध आणायला गेले होते. शेतातून परत येत असताना नदीला पुराचे पाणी वाढल्याने ते नदीमध्ये वाहू लागले. त्यांनी नदीत एका विजेच्या खांबाला पकडून ठेवले होते. गावकऱ्यांनी त्यांना वाचविण्याचा एक तास प्रयत्न केला. दोन टाकून त्यांना बाहेर ओढण्याचा प्रयत्न केला. मात्र, नदीचा प्रवाह जास्त असल्याने त्यांना वाचविण्यात नागरिकांना अपयश आले. त्यांचा शोध घेण्यात येत आहे.
या परिसरात अतिवृष्टीने अनेकांच्या घरांचे नुकसान झाले आहे. जळगाव जामोद तालुक्यातील सुनगाव येथील नदीवरून पाणी वाहत असल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. तसेच गावातील शेतांमध्ये पाणी साचले असून, शेतांना तलावाचे स्वरूप आले आहे. सखाराम वंडाळे यांच्या शेतातील पूर्ण पीक वाहून गेले आहे. खामगाव तालुक्यात शनिवार सकाळपासूनच जोरदार पाऊस झाला. शहरातील मार्केटमध्ये पाणी शिरल्याने व्यावसायिकांचे नुकसान झाले आहे. तसेच सोयाबीन व कपाशी पिकाचे नुकसान झाले आहे.
संग्रामपूर, टुनकीसह अनेक गावांचा संपर्क तुटलाजळगाव जामोद व संग्रामपूर तालुक्याला पावसाचा जोरदार तडाखा बसला आहे. त्यामुळे केदार नदी दुथडी भरून वाहत आहे. संग्रामपूर, टूनकी, बावनबीर यासह या परिसरातील अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. वरवट बकाल व शेगावचा संपर्क तुटला आहे. नदीचे पाणी गावात शिरले असून, जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेकांच्या घरात पाणी शिरल्याने जीवनावश्यक वस्तूंचे नुकसान झाले आहे.
खांब पडले, विद्युत पुरवठा खंडितअतिवृष्टीमुळे अनेक भागातील विद्युत खांब पडले आहेत. विजेच्या तारासुद्धा पडल्या असून, वीजपुरवठा खंडित झाला आहे. शुक्रवारी रात्रीपासून शनिवारी दुपारपर्यंत वीजपुरवठा खंडित होता.