संदीप वानखडे
बुलडाणा : काेराेनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता पाहता शासनाने आता लसीकरणावर भर दिला आहे़ आराेग्य कर्मचाऱ्यांबराेबरच फ्रंटलाईन कर्मचाऱ्याचे लसीकरण वेगाने सुरू आहे़ जिल्ह्यातील २६०४ पाेलीस कर्मचाऱ्यांपैकी २५०० कर्मचाऱ्यांनी काेराेनाचा पहिला डाेस घेतला आहे़ तसेच १८८ पाेलीस अधिकाऱ्यांपैकी १८१ जणांनी काेराेना लस घेतली आहे़
काेराेनाची दुसरी लाट ओसरत असल्याचे दिलासदायक चित्र असतानाच तिसरी लाट येण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तविली आहे़ त्यामुळे, राज्य शासनाच्या वतीने वेळाेवेळी मार्गदर्शन सूचना देण्यात येत आहे़ तिसऱ्या लाटेचा धाेका पाहता आराेग्य विभागाने लसीकरणाचा वेग वाढविला आहे़ आगामी सण, उत्सवांना बंदाेबस्त देताना पाेलीस कर्मचाऱ्यांना काेराेना संक्रमण हाेऊ नये यासाठी प्राधान्याने लसीकरण करण्यात येत आहे़ जिल्ह्यात एकूण २६०४ पाेलीस कर्मचाऱ्यांपैकी २५०० पाेलीस कर्मचाऱ्यांनी काेराेनाची लस घेतली आहे़ तसेच १८८ पाेलीस अधिकाऱ्यांपैकी १८१ अधिकाऱ्यांनी लसीचा डाेस घेतला आहे़ जिल्ह्यात नागरिकांचेही लसीकरण वेगाने करण्यात येत आहे़
युवकांचे सर्वाधिक लसीकरण
जिल्ह्यात सर्वाधिक लसीकरण १८ ते ४४ वयाेगटांतील नागरिकांचे झाले आहे. ४ लाख ५४ हजार ६९० युवकांनी काेराेनाची लस घेतली आहे. तसेच ४५ ते ६० या वयाेगटातील ३ लाख ६४ हजार ४५० जणांनी, तर ३ लाख ३१ हजार २६० वृद्धांनी काेराेनाची लस घेतली आहे. तसेच ५ लाख ४६ हजार ६३२ महिलांनी, तर ६ लाख ३ हजार ६११ पुरुषांनी काेराेनाचा पहिला डाेस घेतला आहे.
काेविशिल्डचा सर्वाधिक वापर
जिल्ह्यात काेराेना लसीकरणात काेविशिल्ड आणि काेव्हॅक्सिन लसीचा वापर करण्यात येत आहे. सर्वाधिक लसीकरण काेविशिल्ड लसीचे झाले आहे. ८ लाख ६० हजार ६७७ जणांना काेविशिल्ड लस देण्यात आली आहे. तसेच २ लाख ८९ हजार ७२३ जणांनी काेव्हॅक्सिन लस घेतली आहे.
काेराेनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेची शक्यता पाहता पाेलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे प्राधान्याने लसीकरण करण्यात आले आहे़ उर्वरित कर्मचाऱ्यांचेही लवकरच लसीकरण करण्यात येत आहे़ आतापर्यंत २५०० पाेलीस कर्मचारी आणि १८१ अधिकाऱ्यांनी काेराेनाचा लस घेतली आहे़
अरविंद चावरीया, पाेलीस अधीक्षक, बुलडाणा