बुलडाणा: एक लाख रुपयांच्या बदल्यात तीन लाख रुपयांच्या नोटा बदलून देतो अशी बतावणी करून मुलांच्या खेळण्यातील नोटा देऊन एकाची फसवणूक केल्याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेने हिंगोली जिल्ह्यातील तिघांना अटक केली आहे. ही कारवाई चिखली येथील खामगाव चौफुलीवर २२ डिसेंबरला रात्री दरम्यान, स्थानिक गुन्हे शाखेने केली. यामध्ये मुळचा नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यात असलेल्या वाकी येथील संतोष जगदेवसारव सुर्यवंशी (ह.मु. कळमनुरी, जि. हिंगोली), राजेश शेषराव बोरकर (रा. सिरसम, जि. हिंगोली) आणि विनोद केरबाजी कुरूडे (मुळ राहणार बोरी, जि. यवतमाळ, ह.मु. सिरसम, जि. हिंगोली) या तिघांना अटक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे हे तीनही आरोपी मजुरी, शेती तथा वाहनांचे पंक्चर काढणाऱ्या व्यक्ती असल्याचे पोलिस तापासात समोर येत आहे. चिखली येथील निलयकुमार रमेशराव देशमुख यांना एक लाख रुपयांच्या बदल्यात तीन लाख रुपयांच्या मुलांच्या खेळण्यातील नोटा देऊन या तिघांनी फसवणूक करण्याचा प्रयत्न केला. खेळण्यातील नोटांच्या बंडलावर चलनातील खऱ्या २०० व ५०० रुपयांच्या नोटा लावून ही फसवणूक करण्यात आली. यासंदर्भात स्थानिक गुन्हे शाखेला गोपनिय माहिती मिळाल्याने चिखली येथील खामगाव चौफुलीवर सापळा रचून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तीनही आरोपींन अटक केली. त्यांच्याकडून बच्चोकी बँक असे लिहिलेल्या खेळण्यातील नोटांसह काही खर्या नोटा जप्त करण्यात आला आहे. प्रकरणाचा पुढील तपास चिखली पोलिसांकडे सोपविण्यात आला आहे. खामगाव चौफुलीवर २२ डिसेंबरला सायंकाळी सात वाजेच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक महेंद्र देशमुख, पोलिस उपनिरीक्षक मुकूंद देशमुख, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक प्रकाश राठोड, अताउल्ला खान, विकास खानझोडे, भारत जंगले, संभाजी असलोकर, संजय म्हस्के, विजय मुंढे यांनी सहभाग घेतला होता.
अशी आहे मोडसआॅपरेंटी
अटक करण्यात आलेले आरोपी हे मुलांच्या खेळण्यातील नोटांच्या बंडलावर खऱ्या २०० व ५०० रुपयांच्या नोटा लावून बंडल पॅक करून घेतात. त्यानंतर अशी पाच ते सात बंडले एकत्र करून ते फ्लॉस्टीकमध्ये घट्टपद्धतीने पॅक करतात. जेणेकरून संबंधिताला ते दिल्यानंतर लगेच त्याला ते उघडून पाहता येत नाही. व आरोपींनी पलायन केल्यानंतर जेव्हा बिंग फुटते तेव्हा वेळ निघून गेलेली असते. मात्र या प्रकरणात निलयकुमार देशमुख यांना संशय आला होता. त्यातच गोपनिय खबर्याने माहिती दिल्याने पोलिसही सतर्क झाले होते, असे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक महेंद्र देशमुख यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.