नियमांचे उल्लंघन होताना दिसून येताच पोलीस प्रशासनासह, महसूल व पालिका प्रशासनाने या ठिकाणी दाखल होत नागरिकांवर गर्दी टाळण्यासंदर्भाने तातडीने निर्बंध घातले.
चिखली शहरात कोरोनाचे वाढते रुग्ण पाहता जिल्हाधिकाऱ्यांनी लॉकडाऊन जाहीर केल्यापासून उत्तम प्रतिसाद मिळत आहे. दरम्यान, दोन दिवसांच्या कडक संचारबंदीदरम्यान अत्यावश्यक कामासाठीच नागरिक बाहेर पडताना दिसून आले. शहरातील हॉस्पिटल, मेडिकल, दूध डेअरी, टायर पंक्चरची दुकाने, पेट्रोल पंप आदी सेवा वगळता इतर सर्व दुकाने, स्टॉल, हॉटेल, बार, रेस्टॉरंट बंद ठेवण्यात आले आहेत. काही प्रमाणात लहान व्यावसायिकांकडून नियमाचे उल्लंघन होत असल्याचे समजताच त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जात आहे. दरम्यान, सर्व शासकीय कार्यालये व बँका बंद असल्याने ग्रामीण भागातील नागरिकांनी शहरात येणे टाळल्याने शहरात लॉकडाऊनला चांगला प्रतिसाद मिळत आहे. ठाणेदार गुलाबराव वाघ, मुख्याधिकारी अभिजित वायकोस, तहसीलदार अजितकुमार येळे यांनी आपल्या सहकारी कर्मचाऱ्यांसह शहरात खडा पहारा ठेवला असल्याने काही ठिकाणचा अपवाद वगळता शहरात सर्वत्र शुकशुकाट दिसून आला. गर्दीमुळे होणारा संभाव्य धोका लक्षात घेता नागरिकदेखील स्वत:हून गर्दी टाळताना दिसत आहेत.
परीक्षार्थींची गैरसोय
प्रशासनाने पूर्वनियोजित परीक्षा वेळापत्रकाप्रमाणे सुरू राहतील, असे स्पष्ट केले असले तरी परीक्षार्थींना या पूर्वनियोजित परीक्षेसाठी हवे असलेले ‘हॉलटीकेट’ व इतर ऑनलाइन कागदपत्रांसाठी गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. मोबाइलवरून ऑनलाइन पद्धतीने परीक्षा कक्ष प्रवेश पत्र डाऊनलोड करणे अनेकांना जमत नाही, तथापि, डाऊनलोड केल्यानंतरही त्याची प्रिंट काढण्यासाठी ऑनलाइन केंद्रांवरच जावे लागते, याशिवाय इतर पदभरती व परीक्षा आदींसाठीही ऑनलाईन केंद्र बंद असल्याने अनेकांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.