चिखली : पाच ग्रामपंचायती अविरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 05:52 AM2021-01-08T05:52:28+5:302021-01-08T05:52:28+5:30
याबाबत निवणूक प्रक्रिया पार पडल्यानंतर प्रशासनाद्वारे अधिकृतरीत्या जाहीर करण्यात येणार असले तरी आमदार श्वेता महालेंच्या आवाहनास यानिमित्ताने सकारात्मक प्रतिसाद ...
याबाबत निवणूक प्रक्रिया पार पडल्यानंतर प्रशासनाद्वारे अधिकृतरीत्या जाहीर करण्यात येणार असले तरी आमदार श्वेता महालेंच्या आवाहनास यानिमित्ताने सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. या पाच ग्रामपंचायती आ.महालेंनी जाहीर केल्याप्रमाणे २१ लाखाच्या विकास निधीच्या मानकरी ठरणार आहेत.
ग्रामपंचायत निवडणुकांमुळे अनेक गावातील सलोख्यास बाधा पोहोचत असल्याने गावपातळीवरील या निवडणुका अविरोध पार पडाव्यात, या हेतूने आ. श्वेता महाले यांनी एक नामी शक्कल लढविली होती. ग्रामपंचायतीची निवडणूक अविरोध पार पाडा अन् २१ लाखाचा विकास निधी मिळवा, अशी बंपर ऑफरच त्यांनी मतदारसंघातील ग्रामस्थांना दिली होती. त्यांच्या आवाहनास मतदारसंघातील पाच गावांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. यामध्ये चिखली तालुक्यातील चांधई, खोर, मालगणी तर बुलडाणा तालुक्यातील पळसखेड भट आणि सिंदखेड या पाच ग्रामपंचायतींचा समावेश आहे. या गावातील सर्व राजकीय पक्षांच्या लोकांनी एकत्र येऊन निवडणुका बिनविरोध होण्यासाठी प्रयत्न केले. उपरोक्त पाच ग्रामपंचायतींना त्यांच्या पूर्ण कार्यकाळात आमदारनिधीसह इतर शासकीय योजनांमधून २१ लाख रुपयांचा निधी विकास कामांसाठी आमदार श्वेता महाले पाटील यांच्या प्रयत्नातून देण्यात येणार आहे. निधीचा विनियोग बिनविरोध निवडून आलेल्या ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच व सदस्यांनी सुचविलेल्या विकास कामांवर खर्च करण्यात येणार आहे. तूर्तास आ. महालेंनी जाहीर केलेल्या या ऑफरसाठी चांधई, खोर, मालगणी, पळसखेड भट आणि सिंदखेड ही पाच गावे पात्र ठरली असून, २१ लाखांच्या विकास निधीचे मानकरी ठरणार असल्याचे निश्चित झाले आहे.