विदर्भातील पहिले स्मार्ट पोलिस स्टेशन चिखलीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2019 04:42 PM2019-06-18T16:42:28+5:302019-06-18T16:42:33+5:30
जीर्ण व पुर्णत: वाताहत झालेल्या ब्रिटीशकालीन इमारतीच्या जागी आता विदर्भातील पहिले स्मार्ट पोलिस स्टेशन दिमाखात उभे आहे.
- सुधीर चेके पाटील
चिखली : भव्यदिव्य प्रवेशव्दार, प्रशस्त व्हरांडा, सर्वसुविधांयुक्त अत्याधुनिक कार्यालय, महिला व पुरूषांसाठी स्वतंत्र ‘लॉकअप’, स्वतंत्र उपहारगृह, मोठा कॉन्फरंन्स हॉल, गाड्यांच्या पार्कींगची स्वतंत्र व्यवस्था आणि अधिकारी, कर्मचाºयांच्या निवासासाठी असलेली भव्य इमारत... या व इतर सर्व अत्याधुनिक सुविधा चिखली पोलिस स्टेशनच्या नव्या इमारतीत उपलब्ध झाल्या आहेत. जीर्ण व पुर्णत: वाताहत झालेल्या ब्रिटीशकालीन इमारतीच्या जागी आता विदर्भातील पहिले स्मार्ट पोलिस स्टेशन दिमाखात उभे आहे.
तीन वर्षांपूर्वी येथील पोलीस वसाहतीत पोलिस कर्मचाºयांना अक्षरश: जीव मुठीत घेवून जगावे लागत होते; तर आता जादुची कांडी फिरावी आणि सगळे बदलावे त्याप्रमाणे अवघ्या तीन वर्षात येथील पोलिस स्टेशन व कर्मचारी वसाहतीत बदल झाला आहे.
१९१७-१८ मध्ये बांधकाम झालेल्या ब्रिटीशकालीन पोलीस स्टेशन व त्याला लागून असलेल्या कर्मचारी निवासस्थानातून चिखली पोलिस स्टेशनचा संपूर्ण कारभार सुरू होता. त्यापश्चात सुमारे १०१ वर्षांच्या प्रदिर्घ कालावधीनंतर येथील पोलिस स्टेशन व कर्मचारी निवासस्थानाने कात टाकली. पोलिस स्टेशनच्या वाढत्या व्यापासोबतच कामकाजासाठी येथील पोलिस स्टेशनचे कार्यालय अपुरे पडत होते. तर कर्मचाºयांसाठी असलेली वसाहत जिर्ण होवून त्या निवासस्थानामध्ये वास्तव्यास असलेल्या कर्मचाºयांसाठी जिकीरीची झाली होती. पोलिस स्टेशनला लागूनच असलेल्या पोलिस वसाहतीतील ४६ घरांची जीर्णावस्था झाली होती. या ४६ निवासस्थानांपैकी २४ ओस पडली होती. तर उर्वरीत निवासस्थानांमध्ये काही पोलिसांच्या कुटुंबीयांना जीव मुठीत धरून राहावे लागत होते. त्यातही अनेक घरांना धड दरवाजे नव्हते, खिडक्या तुटलेल्या, पावसाळ्यात छतातून टपकणारे पाणी, घरांच्या दरवाजांनी पाठिंबा काढून घेतलेला, खिडक्यांची तावदानेच काय; पण पट आणि गजही गायब, घरातील फरशाही नाहीशा झालेल्या, स्वच्छतागृह व न्हानी घरांची अत्यंत खस्ता हालत, आदी विविध समस्यांचे ओझे येथील पोलिस वसाहतीत राहणारे पोलिस कर्मचारी व त्यांच्या कुटूंबियांना सहन करावे लागत होते.
दरम्यान, २०१५ मध्ये ‘लोकमत’ने हा मुद्दा उपस्थित केला. पोलीस हा जनतेचा मित्र असल्याचे सांगितले जाते, पण जनता आणि पोलीस यांच्यात नेहमीच एक अदृश्य अंतर असते. त्याला कारण, त्याच्या अंगावरची खाकी वर्दी. या वर्दीच्या आतला माणूस नेहमीच सामान्यांसाठी गूढ असला, तरी तो माणूसच असतो. त्याला भावना असतात, वेदना असतात, विवंचनाही असतात. या विवंचनेला माध्यमातून ‘लोकमत’ने वाचा फोडली. तथापी सुमारे ९७ वर्षे जुनी इमारत राहण्यास योग्य नसल्याचा निर्वाळा सार्वजनिक बांधकाम विभागाने २०१० दिला होता. त्याचा दाखला देत पुनर्बांधणीसाठी स्थानिक पोलीस प्रशासनाने २०१३ मध्ये केलेल्या पाठपुराव्याने मंजूर झालेला निधी परत गेल्याच्या बाबीवर प्रकाश टाकून नव्याने या प्रकल्पास मंजुरात व सध्याच्या महागाई नुसार निधीत वाढ मिळण्याची गरज अधोरेखीत केली होती.
या सर्व बाबीची दखल घेत आमदार राहुल बोंद्रे यांनी कर्मचारी निवासस्थान आणि पोलीस स्टेशनच्या अत्याधुनिक इमारतीच्या प्रस्तावासाठी वेळोवेळी पाठपुरावा केल्याने त्यास मंजुरात मिळाली. पोलिस प्रशासन, सार्वजनिक बांधकाम विभाग, लोकप्रतिनिधी आणि पत्रकार यांनी घेतलेल्या परिश्रमाला अखेरीस यश आले. यानिमित्ताने विदर्भातील पहिले स्मार्ट पोलिस स्टेशन चिखली येथे उभारल्या गेले. गेल्या तीन वर्षांत पालिकेच्या मुकूल वासनिक सांस्कृतिक भवनात हलविण्यात आलेले पोलिस स्टेशनचे सध्या नव्या व हक्काच्या सुसज्ज वास्तुत ‘शिफ्टींग’चे काम सुरू असून लोकार्पणाच्या औपचारीकतेनंतर या स्मार्ट पोलिस स्टेशनमधून कामकाज चालणार आहे.
काय आहे या स्मार्ट पोलिस स्टेशनमध्ये
चिखली पोलिस स्टेशनची नविन वास्तु पोलीसांच्या कामकाजाच्या दृष्टीने व कर्मचाºयांच्या निवासस्थानाच्या दृष्टीने उपयुक्त असून प्रत्यक्ष कामकाजास सुरूवात झाल्यानंतर विदर्भातील पहिले स्मार्ट पोलीस स्टेशन ठरणार आहे. यामध्ये अधिकारी, कर्मचाºयांसाठी निवास व्यवस्था, कॉन्फरस हॉल, महिलांसाठी स्वतंत्र विश्राम गृह, सायबर क्राईम तपासासाठी स्वतंत्र सिसिटीएनएस रूम, पुरूष व महिलांसाठी वेगवेगळे लॉकप व उपहार गृह आदी सुविधा राहणार आहेत.
आ. बोंद्रेंच्या पाठपुराव्याला यश
आमदार राहुल बोंद्रे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याने नविन अत्याधुनिक इमारती बरोबरच स्मार्ट पोलीस स्टेशनचा सुमारे १७.७४ कोटी रूपयांचा प्रस्ताव मंजूर झाला होता. या निधीतून पोलीस निरीक्षक, दुय्यम निरिक्षक, पोलीस अधिकारी आणि ७२ पोलीस कर्मचाºयांसाठी स्वतंत्र निवास व्यवस्थेसह सर्वसुविधायुक्त इमारत उभारण्यात आली आहे. नविन व अत्याधुनिक स्मार्ट पोलिस स्टेशनची वास्तु देखील दार्शनिक ठरले आहे. कंत्राटदार योगेश राठी यांनी पूर्ण मेहनतीने हे काम पूर्ण केले आहे.
ठाणेदारांच्या पाऊलखुणा जपणारी इमारत
तीन वर्षे कसे-बसे काढायचे.. त्यामुळे कशाला डोकेदुखील लावून घ्यायची! या विचारातून या पोलिस स्टेशन व कर्मचारी निवासस्थानाचा प्रस्तावाला गती मिळत नव्हती. मात्र, नियमित कर्तव्यासोबतच बदलीनंतरही आपल्या पाऊलखुणा कायम राहाव्यात, म्हणून येथे ठाणेदार म्हणून कर्तव्य बाजावलेल्या काही ठाणेदारांनी या प्रस्तावासाठी घेतलेली मेहनत आज येथे दिसून येते. तत्कालीन ठाणेदार पी. टी. इंगळे हे आता सेवानिवृत्त झाले असले तरी त्यांनी या प्रस्तावासाठी सर्वप्रथम पुढाकार घेतला. त्यांच्यापश्चात आलेले ठाणेदार विजयसिंग राजपूत यांनी त्यात सातत्य राखले तर ठाणेदार महेंद्र देशमुख यांच्या कार्यकाळात प्रत्यक्ष बांधकामास सुरूवात झाली आणि आताचे ठाणेदार गुलाबराव वाघ यांच्या कार्यकाळात ही वास्तू लोकार्पणासाठी सज्ज आहे. उपरोक्त चारही ठाणेदारांचे आणि त्यांच्या कार्यकाळातील वरिष्ठांसह सध्याचे जिल्हा पोलिस अधिक्षक दिलीप पाटील भुजबळ, अपर पोलिस अधिक्षक संदीप डोईफोडे, उपविभागीय पोलिस अधिकारी बी. बी. महामुनी यांचे मोठे योगदान या नव्या ईमारतीला लाभले आहे.