सर्पदंशाने बालकाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2021 04:36 AM2021-07-28T04:36:10+5:302021-07-28T04:36:10+5:30
माेताळा : शेतात काम करीत असलेल्या मुलाला विषारी सापाने दंश केल्याची घटना २६ जुलै राेजी तराेडा शिवारात घडली़ ...
माेताळा : शेतात काम करीत असलेल्या मुलाला विषारी सापाने दंश केल्याची घटना २६ जुलै राेजी तराेडा शिवारात घडली़ या मुलाचा उपचारादरम्यान बुलडाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात मृत्यू झाला़ जीवन मेरसिंघ भेलके असे मृतक मुलाचे नाव आहे़
मोताळा तालुक्यातील ग्राम तरोडा येथील १५ वर्षीय जीवन मेरसिंघ भेलके हा मुलगा सोमवारी शेतात कामासाठी गेला होता़ दुपारच्या वेळी शेतात काम करताना त्याच्या हाताला अचानक एका सापाने चावा घेतला. ही बाब लक्षात येताच जीवनच्या नातेवाईकांनी बुलडाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले़ मात्र चावा घेणारा साप अति विषारी असल्याने उपचार सुरु असताना जीवनचा मृत्यू झाला. याप्रकरणी बुलडाणा शहर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद घेण्यात आली आहे.
आणखी एका बालिकेला सर्पदंश
तराेडा येथीलच १६ वर्षीय बालिका दीक्षा शेरसिंग रबडे हिला ही साेमवारीच विषारी सापाने दंश केला़ तिच्यावर बुलडाण्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत़ काही दिवसांपूर्वी सूचित मयाराम जाधव (१७) हा शेतात काम करीत असताना त्याला सर्पदंश झाला हाेता़ त्याच्यावरही उपचार सुरू आहेत़ गत काही दिवसांपासून सर्पदंशाच्या घटनेत वाढ झाली आहे़
दाेन महिलांना सर्पदंश
पावसाळा सुरू झाल्यापासून सर्पदंशाच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे़ २७ जुलै राेजी दोन महिलांना सर्पदंश झाल्यामुळे त्यांच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत़ चिखली तालुक्यातील ग्राम ब्रह्मपुरी येथील ४५ वर्षीय उज्वला सदाशिव अंभोरे या मंगळवारी शेतात कामासाठी गेले होते. शेतात काम करताना त्यांच्या हाताला एका सापाने चावा घेतला़ दुसरी घटना चिखली तालुक्यातील डोंगर शिवली येथे घडली आहे. बय्यो बी शेख सगीर ५५ यांना सुद्धा सापाने दंश केला़ त्यांच्यावरही उपचार सुरू आहेत़