बुलडाणा : कोरोना महामारीच्या दीड वर्षानंतरही शाळा सुरू झालेल्या नाहीत. कोरोनामुळे मुलांना घराबाहेर जाता येत नाही. यात मुलांच्या शारीरिक हालचाली मंदावल्या आहेत. ऑनलाईन शिक्षणामुळे सतत मोबाईल आणि दिवसभर टीव्हीमुळे मुलांमध्ये चिडचिड वाढली आहे. बैठ्या जागेवर सतत काही ना काही खात राहण्याची प्रवृत्ती वाढली आहे. यात अतिपोषण ही समस्या झाली आहे.
मुलांचे वजन वाढले आहे. मुलांमधील स्थूलता चिंतेचा विषय बनला आहे. त्यामुळे पालक वर्ग चिंतीत आहे. दुसऱ्या लाटेनंतर पुन्हा तिसरी लाट येण्याची शक्यता आरोग्य संस्थेने वर्तविली असून, ती लहान मुलांसाठी धोक्याची घंटा असल्याचे म्हटले जात असल्याने मुलांना आणखी सुरक्षित ठेवण्याच्या दृष्टीने बाहेर पडू नये, ही भीती कायमची सतावत आहे. ग्रामीण भागात मात्र, मुलांमध्ये कुपाेषणाचे प्रमाण असल्याचे दिसत आहे़
शहरांमध्ये स्थूलता ही नवी समस्या
कोरोनामुळे शाळा बंद आहेत. मुलांना घराबाहेर पडता येत नाही. यात त्यांच्या शारीरिक हालचाली मंदावल्या आहेत. एकसारखे मोबाईलसमोर वा टीव्हीसमोर बसून राहावे लागत मुलांचे वजन वाढले आहे. १५ ते १८ किलो वजनाच्या मुलांचे वजन ४०ते ४२ किलोपर्यंत पोहोचले आहे. त्यांच्यात लठ्ठपणा जाणवायला लागला आहे. यातून स्थूलता ही नवी समस्या शहरात उभी ठाकली आहे.
स्थूलतेची कारणे काय?
एकाच ठिंकाणी बसून राहणे.
शारीरिक हालचाली नसणे.
सतत टीव्ही पाहणे आणि माेबाईलचा प्रमाणापेक्षा अधिक वापर करणे.
जंकफूडचे जास्तीत जास्त सेवन करणे.
सतत काही ना काही खात राहणे.
पालकांची चिंता वाढली
शाळा बंद असल्यामुळे मोबाईलचा वापर वाढला आहे. याचा परिणाम मुलांच्या डोळ्यांवर होत आहे. सतत ऑनलाईन क्लास करीत असल्यापुळे पुलांची स्थूलता वाढली आहे़
सुभाष अढाव, पालक
गत वर्षांपासून शाळा बंदच असल्याने मुले घरातच असतात़ तसेच ऑनलाईन शाळेमुळे माेबाईल, टॅबवरच त्यांचा वेळ जात आहे़ दुसरीकडे घरीच असल्याने सतत जंक फूड व इतर सेवण करणे सुरूच असल्याने मुलांचे वजन वाढत आहे़
गजानन आखाडे, पालक
तज्ज्ञ काय म्हणतात
कोरोना काळात फिजिकल ॲक्टिव्हिटी थांबल्या आहेत. जंक फूडचे अधिक सेवन यामुळे मुलांचे वजन वाढते़ त्यात लहान मुलांचे वजन ४० ते ४५ किलोंपर्यंत गेले आहे. स्थूलता ही समस्या निर्माण झाली आहे.
- डॉ. नकुल फुले. बालरोगतज्ज्ञ डोणगांव
कोविडमध्ये शाळा बंद राहिल्याने मुलांच्या आहार आणि शारीरिक हालचालींवर नकारात्मक परिणाम झाला. लॉकडाऊनपूर्वी नोंदविलेल्या वर्तनांच्या तुलनेत कोविड काळात मुलांनी रोज जास्त पौष्टिक व अतिरिक्त जेवणाने स्थूलता वाढली.
-डॉ. गजानन उल्हेमाले, बालरोगतज्ज्ञ तथा आयुर्वेद तज्ज्ञ