चिमणी- पाखरांना अंगणवाडीचे दाणापाणी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2021 04:34 AM2021-04-21T04:34:36+5:302021-04-21T04:34:36+5:30
सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत. हळूहळू पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे. पूर्वीसारखे पाण्याचे नैसर्गिक स्रोत शिल्लक राहिलेले नाहीत. परिणामी पशुपक्ष्यांना ...
सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत. हळूहळू पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे. पूर्वीसारखे पाण्याचे नैसर्गिक स्रोत शिल्लक राहिलेले नाहीत. परिणामी पशुपक्ष्यांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते. बऱ्याचदा पाण्यासाठी तडफडून पक्ष्यांचा जीव जातो. ही परिस्थिती लक्षात घेता बालविकास प्रकल्प अधिकारी जी. बी. शिंदे यांनी उन्हाळ्यात पक्ष्यांची दाणापाण्याची सोय करण्याचे आवाहन अंगणवाडी सेविका, मदतनीस यांना केले होते. 'पक्ष्यांसाठी मूठभर धान्य आणि पाणी' ही संकल्पना राबविण्याचे सांगितले होते. त्यांच्या आवाहनाला अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी भरभरुन प्रतिसाद दिला. बुलडाणा तालुक्यातील सर्वच अंगणवाडी केंद्रांमध्ये पक्ष्यांसाठी जलपात्र लावण्यात आले. आता दररोज त्यामध्ये धान्य आणि पाणी टाकण्यात येणार आहे. त्यामुळे पक्ष्यांची पाण्यासाठीची भटकंती थांबणार आहे. शासनाची कोणतीही योजना असो, उपक्रम असो त्याची जबाबदारी पार पाडताना अंगणवाडी कर्मचारी जीव ओतून काम करतात. कधीच कोणती तक्रार करीत नाही. आतापर्यंत जसे इतर उपक्रम राबविले तसेच हा उपक्रम आम्ही राबविणार. शिवाय हे काम करताना आत्मिक समाधान लाभत असल्याचे अंगणवाडी सेविकांनी सांगितले.
परसबागेला उत्स्फूर्त प्रतिसाद
बुलडाणा प्रकल्पांतर्गत सर्व अंगणवाडी केंद्रांत याआधी 'पोषण माह' राबविण्यात आला होता. त्यानुसार परसबाग फुलविण्यात आल्या होत्या. या उपक्रमाला भरभरून प्रतिसाद मिळालेला आहे. विशेष म्हणजे कोरोनाकाळात या परसबागेतील पालेभाज्या गरोदर महिला, स्तनदा मातांना वाटप करण्यात आल्या.