मानधन योजनेसाठी बुलडाणा जिल्ह्यातील २४० कलावंताची निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2019 06:28 PM2019-08-30T18:28:47+5:302019-08-30T18:28:50+5:30
- रफिक कुरेशी मेहकर : समाज कल्याण विभागाच्या वतीने गेल्या चार वर्षापासून वृद्ध साहित्यिक व कलावंत मानधन योजनेअंतर्गतचे अर्ज ...
- रफिक कुरेशी
मेहकर: समाज कल्याण विभागाच्या वतीने गेल्या चार वर्षापासून वृद्ध साहित्यिक व कलावंत मानधन योजनेअंतर्गतचे अर्ज धुळखात पडून होते. दरम्यान, मानधन योजनेसाठी बुलडाणा जिल्ह्यातील २४० कलावंत लाभार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. निवड झालेल्या कलावंताचे बँक खाते माहिती तात्काळ सादर करण्याच्या सुचना जिल्हा समाज कल्याण अधिकाºयांनी पंचायत समित्यांचे गट विकास अधिकाºयांना दिल्या आहेत.
दुसरीकडे शासनाने साहित्यिक कलावंतांच्या मानधनात दीडपट वाढ केल्याने काही प्रमाणावर कलावंतामध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. राज्यातील साहित्यिक व कलावंत यांना शासनाकडून वृद्ध साहित्यिक व कलाकार मानधन योजनेअंतर्गत तूटपूंजे मानधन देण्यात येते. दरवर्षी प्रत्येक जिल्ह्यातून ६० पात्र कलावंतांची निवड करण्यात येते. मात्र बुलडाणा जिल्ह्यात गेल्या २०१५-१६ पासून आतापर्यंत अर्ज सादर करूनही शासनाने पात्र कलावंतांची निवड केली नव्हती. त्यामुळे अनेक कलावंतावर उपासमारीची वेळ आली होती. यासंदर्भात कलावंतांनी विविध आंदोलनही केले होते. समाजकल्याण विभागाने गेल्या चार वर्षातील जिल्ह्यातील २४० कलावंतांची निवड केली आहे. त्यात अ वर्ग कलावंत १४, ब वर्ग ६०, क वर्ग १६६ असे एकूण २४० कलावंताचा समावेश आहे. राज्यातील ज्येष्ठ साहित्यिक व कलावंत शासनाकडून देण्यात येणाºया तटपूंजी मानधनात आता दीडपट वाढ करण्याच्या निर्णयही राज्य मंत्रिमंडळाने बुधवारी घेतल्याने या निर्णयाचा फायदा राज्यातील २६ हजार कलावंतांना होणार आहे. या सोबतच प्रत्येक जिल्ह्यात दरवर्षी ६० कलावंतांची निवड होत होती. मात्र आता १०० कलावंतांची निवड करण्यात येणार आहे. सध्या अ वर्ग कलावंतांना २ हजार १०० रुपये, ब वर्ग कलावंतांना १ हजार ८०० रुपये तर क वर्ग कलावंतांना १ हजार ५०० रुपये याप्रमाणे दरमहा मानधन दिले जात होते. यात दीड पटीने वाढ केल्याने हे मानधान आता अ वर्गासाठी ३ हजार १५०, ब वर्ग साठी २ हजार ६०० रुपये आणि क वर्ग साठी २ हजार २५० प्रमाणे मिळणार आहे.
एसटी प्रवास मोफत करण्याची मागणी
कलावंतासाठी विविध योजना असतानाही त्याची योग्य अंमलबजावणी होत नसल्याने त्यांना लाभापासून वंचीत रहावे लागते. दरम्यान, राज्य शासनाने कलावंतासाठी एसटी प्रवास मोफत करून त्यांना राहण्यासाठी घर बांधून देण्याची मागणीही जोर धरत आहे.
वृद्ध साहित्यिक व कलाकार मानधन योजनेअंतर्गत निवड झालेल्या वृद्ध साहित्यिक व कलावंतांचे बँक खात्याची माहिदी कलावंतांना मागविण्यात आली आहे. लवकरात संबंधित विभागाला ही माहिती सादर करण्यात येईल.
- आशिष पवार, गट विकास अधिकारी
पंचायत समिती, मेहकर.