लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : वऱ्हाडातील हिलस्टेशन म्हणून ओळख असलेले बुलडाणा शहर मागील दोन दिवसांपासून सकाळी आणि सायंकाळी धुक्यात हरवून जात असल्याचे चित्र आहे. अगदी सकाळी वाहनांचे दिवे लावून वाहने चालवावी लागत असल्याचे चित्र सध्या शहरात दिसून येत आहे. डोंगरदऱ्यांनी नटून गेलेला बुलडाणा शहराचा परिसर श्रावणात आणखीनच खुलून जातो. सध्या श्रावण सुरू असून, बुलडाणा शहरात मागील दोन दिवसांपासून वरूणराजाची कृपादृष्टी होत आहे. रिमझिम बरसणाऱ्या श्रावण सरींमुळे हवेत गारवा दाटला आहे. सोबतच सकाळी आणि सायंकाळी संपूर्ण शहर धुक्यात गडप होत असल्याचे चित्र आहे. सध्या बुलडाण्याचे तापमान कमाल २३ सेल्सिअस इतके असून, नागरिकांना गरम कपडे परिधान करावे लागत आहेत. काही दिवस असेच वातावरण राहणार असल्याचा अंदाज आहे.
बुलडाणा शहर हरविले धुक्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2021 11:38 AM