नगरपालिकेच्या महसूलवाढीसाठी शहरात काही ठिकाणी जाहिरातींचे फलक लावण्यासाठी जागा निश्चित करण्यात आलेल्या आहेत; परंतु अनेक नागरिक शुभेच्छांचा फलक असेल किंवा क्लासेसच्या जाहिरातींचे फलक लावण्यासाठी नगरपालिकेची परवानगी न घेता अनधिकृत वाट्टेल तिथे फलक लावताना दिसून येत आहेत. अनधिकृत होर्डिंग्जमुळे शहर विद्रुप होत आहे. या फुकट्या जाहिरातदारांमुळे शहराचे साैंदर्यीकरण अडचणीत आणले आहे. यामध्ये काही लोकप्रतिनिधींचेही अनधिकृत होर्डिंग्ज आहेत. यावर कारवाई होत नसल्याने अनेक जण अनधिकृत फलक लावण्याला घाबरत नाहीत. शाळा, महाविद्यालयांसमोरही अनेक खासगी क्लासेसचालकांनी फलक लावलेले दिसून येतात.
दंडच होत नसल्याने मिळते अभय
अनधिकृत जाहिरातींचे फलक लावणाऱ्यांवर नगरपालिकेकडून कुठलीही कारवाई करण्यात येत नाही. अनधिकृत फलक हटविण्याची मोहीम शहरात राबविण्यात येते; परंतु त्यावर दंड हाेत नाही. अनधिकृत फलक लावल्यानंतरही त्यावर दंड होत नसल्याने असे फलक लावणाऱ्यांना अभय मिळत आहे. ज्यांनी फलक लावले, त्याचा शोध घेऊन त्याच्यावर दंडात्मक कारवाई केल्यास या प्रकाराला आळा बसू शकतो.
होर्डिंग्जमधून पालिकेची लाखोंची कमाई
मागील वर्षी २० लोकांनी शहरात होर्डिंग्ज लावण्याबाबत नगरपालिकेची परवानगी घेतली होती. त्यामध्ये जाहिरातीचे फलक लावण्याचे दिवस, फलकाचा आकार यावरून त्याला शुल्क आकारण्यात आला आहे. यामध्ये जवळपास १ लाख ३९ हजार ६०० रुपये महसूल नगरपालिकेचा जमा झाला आहे. दरवर्षी दोन लाखापर्यंत पालिकेची कमाई होते.
प्रशासनाच्या डुलक्या
प्रशासनाच्या डुलक्यांमुळे शहरात अनधिकृत फलकबाजी मुख्य चाैकातही सुरू आहे. काही जागा मालकांनी आपल्या घरांवर मोठ्या फ्रेम तयार करून ठेवलेल्या आहेत. त्यावर जाहिराती लावल्या जातात; परंतु इतरांसाठी फ्रेम धोकादायक ठरत आहेत.
शहरात कुठेही अनधिकृत फलक लावलेले आढळून आल्यास त्यावर तत्काळ कार्यवाही करून ते काढून टाकण्यात येते. जाहिरातदारांनी नगरपालिकेची रितसर परवानगी घेऊन असे फलक लावावे.
- स्वप्नील लघाने, उप-मुख्यकार्यकारी अधिकारी, न. प. बुलडाणा.