वर्ग सुरू झाले नाही, तरी शैक्षणिक सत्र सुरू होणार - एजाज खान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2020 05:05 PM2020-05-30T17:05:25+5:302020-05-30T17:05:35+5:30
र्ग सुरू झाले नाही, तरी नवे शैक्षणिक सत्र सुरू होईल, असे मत प्राथमिक शिक्षणाधिकारी एजाज खान यांनी व्यक्त केले.
- ब्रह्मानंद जाधव
बुलडाणा : राज्य शासन १५ जूनपासून शाळा, महाविद्यालय सुरू करण्याच्या विचारात आहे. परंतू काही ठिकाणी कोरोनाचे रुग्ण वाढतच आहेत. रुग्ण असलेल्या ठिकाणी किंवा शाळा क्वारंटीन सेंटर असेल, अशा ठिकाणी शाळा भरवणे अवघड आहे. त्यामुळे वर्ग सुरू झाले नाही, तरी नवे शैक्षणिक सत्र सुरू होईल, असे मत प्राथमिक शिक्षणाधिकारी एजाज खान यांनी व्यक्त केले. कोरोनाचे वाढते रुग्ण आणि शाळा सुरू करण्याबाबत शिक्षणाधिकारी एजाज खान यांच्याशी साधलेला संवाद...
शाळा सुरू करण्याबाबत प्रत्यक्षात काय स्थिती आहे?
शाळा सुरू केंव्हा होणार यावर निर्णय वरिष्ठ पातळीवरुन होत आहे. परंतू ज्या ठिकाणी शाळा भरवायची त्याठिकाणचे पालक, शाळा व्यवस्थापन समिती यांनाही विश्वासात घेतले जाणार आहे. त्या गावात रुग्ण नसलीत, शाळा क्वारंटीन नसेल, तर अशा ठिकाणी शाळा भरवण्यास काहीच हरकत नाही.
रुग्ण असलेल्या भागात नवीन सत्र कसे सुरू करणार?
ज्या भागात कोरोनाचे रुग्ण आहेत, त्याठिकाणी वर्ग सुरू करू शकत नाहीत, अशा ठिकाणी आॅनलाइन शिक्षण प्रणालीचा वापर करू. स्थानिक केबल नेटवर्कचाही यासाठी उपयोग केला जाऊ शकतो. प्रशिक्षीत शिक्षकांचे व्हिडीओ पालकांच्या मोबाईलवर पाठवून ते विद्यार्थ्यांना दाखवून दिल्या जातील. त्यासाठी नियोजन करण्यात येत आहे.
ग्रामीण भगाात आॅनलाइन शिक्षणासाठी अडचणी येऊ शकतात का?
ग्रामीण भागातील पालकांकडे स्मार्ट फोन असण्याची शक्यता कमी आहे. त्याची माहिती घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. ज्याच्याकडे मोबाईल नाही, त्या विद्यार्थ्याला मोबाईल असलेल्या विद्यार्थ्यासोबत बसविता येईल. गर्दी न होता एका मोबाईलवर दोन विद्यार्थी शिक्षण घेऊ शकतात. अशाप्रकारे ९० टक्के विद्यार्थ्यांपर्यंत आपण पोहचू शकतो.
विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने काय नियोजन आहे?
ज्या गावातील शाळा सुरू होतील, अशा ठिकाणी विद्यार्थ्यांच्या अरोग्याची सुरक्षा घेण्याच्या अनुषंगाने नियोजन केलेले आहे. त्या शाळेत विद्यार्थ्यांची गर्दी होणार नाही, यासाठी विद्यार्थ्यांना विषम संख्येप्रमाणे शाळेत बोलाविण्यात येईल. तसे विद्यार्थ्यांना नंबर दिलेले आहेत. विद्यार्थी संख्या जास्त असेल तर दोन सत्रात शाळा घेण्यात येईल. शाळा सॅनिटाईज करून वापरणे, शाळेत मुलांना तीन वेळा हात धुण्यासाठी साबन, सॅनिटायझर ठेवण्यात येईल.
लॉकडाउनमध्ये आॅनलाइन अभ्यासक्रमाला विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला. यापूर्वी क्वारंटीन असलेल्या शाळा आता निर्जंतुकीकरण करून वापरण्यात येतील. त्यासाठी शाळा व्यवस्थापन समिती, पालकांची भूमिका महत्त्वाची राहणार आहे.