महापोर्टल बंद करुन सरळ सेवा भरती करावी - नानाभाऊ कोकरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2019 02:24 PM2019-12-04T14:24:48+5:302019-12-04T14:24:54+5:30
महापोर्टल ची चौकशी केल्यास भरती घोटाळा उघडकीस येण्याची शक्यता असल्याचेही इच्छुक उमेदवारांचे म्हणणे आहे.
खामगाव: शासकीय नोकरभरतीसाठी सुरू करण्यात आलेले महापोर्टल बंद करुन सरळ सेवा भरती करण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी आमदार नानाभाऊ कोकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे एका निवेदनाव्दारे केली आहे.
निवेदनामध्ये नमुद आहे की, राज्य सेवा अंतर्गत वर्ग ३ व ४ च्या पदासाठी शासकीय नोकरभरती करताना पारदर्शकता रहावी, आॅनलाइन अर्ज करता यावा यासाठी मागील राज्य सरकारने महासेवा पोर्टल सुरू केले होते. मात्र, या पोर्टलमुळे मदत होण्याऐवजी अडचणी निर्माण होत असल्याच्या तक्रारी राज्यातील इच्छुक उमेदवारांकडून होत आहेत. बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील इच्छुक उमेदवारांनी सुध्दा महापोर्टल कडून मेगा भरतीची प्रक्रिया राबविताना गैरप्रकार होत असल्याच्या तक्रारी केल्या आहेत. या महापोर्टल ची चौकशी केल्यास भरती घोटाळा उघडकीस येण्याची शक्यता असल्याचेही इच्छुक उमेदवारांचे म्हणणे आहे. त्यामुळे मागील सरकारने सुरू केलेले हे महापोर्टल बंद करून पूर्वीप्रमाणेच नोकरभरतीसाठी परीक्षा घेण्यात यावी. तसेच उमेदवारांना निवासी क्षेत्रात किंवा जिल्हा अंतर्गत परीक्षा केंद्र देण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे.