अंजली दमानियांच्या विरोधातील तक्रार मुक्ताईनगर पोलिसांकडे वर्ग! 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2018 05:39 PM2018-07-10T17:39:40+5:302018-07-10T17:42:56+5:30

खामगाव :  माजी मंत्री एकनाथ खडसे यांची प्रतिमा मलिन करण्यासाठी न्यायालयाची फसवणूक करणाऱ्या अंजली दमानिया यांच्या विरोधात खामगाव ग्रामीण पोलिसांमध्ये तक्रार दाखल करण्यात आली.

A complaint against Anjali Damaniya transfer to muktainagar police | अंजली दमानियांच्या विरोधातील तक्रार मुक्ताईनगर पोलिसांकडे वर्ग! 

अंजली दमानियांच्या विरोधातील तक्रार मुक्ताईनगर पोलिसांकडे वर्ग! 

Next
ठळक मुद्देदमानिया यांच्या विरोधात बुलडाणा जिल्ह्यात दाखल आणखी १२ तक्रारींही मुक्ताईनगर पोलिसांकडे वर्ग होण्याची शक्यता. त्यामुळे आगामी काळात दमानियांच्या अडचणीत वाढ होणार असल्याचे दिसते.


- अनिल गवई 

खामगाव :  माजी मंत्री एकनाथ खडसे यांची प्रतिमा मलिन करण्यासाठी न्यायालयाची फसवणूक करणाऱ्या अंजली दमानिया यांच्या विरोधात खामगाव ग्रामीण पोलिसांमध्ये तक्रार दाखल करण्यात आली. ही तक्रार मंगळवारी खामगाव ग्रामीण पोलिसांनी मुक्ताईनगर पोलिसांकडे वर्ग केली. त्यामुळे आगामी काळात दमानियांच्या अडचणीत वाढ होणार असल्याचे दिसते.

मुंबई येथील सामाजिक कार्यकर्त्या तथा ‘आप’च्या पदाधिकारी अंजली दमानिया यांनी माजी मंत्री तथा भाजपनेते एकनाथ खडसे यांच्यावर आरोप करताना तसेच खडसे यांना खोट्या गुन्ह्यामध्ये अडविण्याच्या दृष्टीकोनातून चोपडा अर्बन को-आॅप बँक लि. चोपडा या बँकेचे खोटे चेक अस्तित्वात आणले. इतकेच नव्हे तर हे चेक खरे म्हणून न्यायालयात सुध्दा वापरले. भाजप नेते एकनाथ खडसे यांच्यासोबतच भारतीय जनता पक्षाची प्रतिमा मलिन करण्यासाठी दमानिया यांनी न्यायालयाचीही फसवणूक केली. त्यामुळे त्यांच्यावर विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यासाठी खामगाव शहर पोलिस स्टेशनसह जिल्ह्यात १३ ठिकाणी तक्रारी करण्यात आल्या. दरम्यान, माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी दाखल केलेल्या उपरोक्त आशयाच्या तक्रारीवरून मुक्ताईनगर पोलिसांनी अंजली दमानिया यांच्या विरोधात  अप क्रमांक ११६/१८ कलम ४२०, ४६७, ४६८, ४७१, ३७९, ३८०, १२० ब भादंविनुसार गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे सामाजिक कार्यकर्ते माधव पाटील यांनी खामगाव ग्रामीण पोलिस स्टेशनमध्ये दिलेल्या तक्रारीवर नव्याने गुन्हा दाखल न करता, सदर तक्रार मंगळवारी मुक्ताईनगर येथे वर्ग केली आहे. तथापि, दमानिया यांच्या विरोधात बुलडाणा जिल्ह्यात दाखल आणखी १२ तक्रारींही मुक्ताईनगर पोलिसांकडे वर्ग होण्याची शक्यता असल्याने दमानिया यांच्या अडचणीत वाढ होणार असल्याचे दिसते.


जिल्ह्यातील इतर तक्रारींही होणार वर्ग!

भाजपनेते तथा माजी मंत्री एकनाथ खडसे यांना खोट्या गुन्ह्यात अडकविण्यासाठी दमानिया यांनी न्यायालयाची फसवणूक केल्याप्रकरणी सामाजिक कार्यकर्ते माधव पाटील यांच्याप्रमाणेच बोरी अडगाव येथील अच्युतराव पुरूषोत्तम टिकार यांनी शहर पोलिस स्टेशनमध्ये तर अभिमन्यू त्र्यंबक पांढरे यांनी हिवरखेड पोलिस स्टेशनमध्ये,  मेहकर येथे चंदन किशोर सहगल जिल्हा सरचिटणीस, भाजयुमो, बुलडाणा, डोणगाव येथे प्रदीप दत्तात्रय इलग जिल्हाध्यक्ष विद्यार्थी आघाडी भाजप, चिखली येथे संतोष मुरलीधर अग्रवाल, रायपूर पोलिस स्टेशनमध्ये प्रभाकर लक्ष्मण जवंजाळ यांनी तर अमडापूर पोलिस स्टेशनमध्ये पंजाबराव हिंमतराव जंवजाळ यांच्यासोबतच  लोणार आणि जानेफळ पोलिस स्टेशनमध्येही तक्रार दाखल केली होती. या तक्रारींही आता मुक्ताईनगर पोलिसांमध्ये वर्ग होणार असल्याचे दिसते. 


अंजली दमानिया या सामाजिक कार्यकर्त्या नसून खोट्या तक्रारकर्त्या आहेत. त्यांच्या विरोधात पोलिसांनी खामगावात गुन्हा दाखल करणे अपेक्षीत होते. दरम्यान, पोलिसांनी प्रकरण वर्ग करून पुढील कारवाईसाठी मुक्ताईनगरकडे पाठविल्याचे समाधान आहे.

    - माधव पाटील,   तक्रारकर्ते, खामगाव.

अंजली दमानिया यांनी फसवणूक केल्याप्रकरणी माधव पाटील यांनी खामगाव ग्रामीण पोलिस स्टेशनला तक्रार दाखल केली होती. मात्र, या आशयाच्या तक्रारींवरून मुक्ताई नगर येथे दमानिया यांच्या विरोधात गुन्हा दाखल आहे. त्यामुळे माधव पाटील यांची तक्रार मंगळवारी मुक्ताईनगर येथे वर्ग करण्यात आली आहे. 

    - रफीक शेख,    पोलिस निरिक्षक, खामगाव ग्रामीण स्टेशन, खामगाव.
 

Web Title: A complaint against Anjali Damaniya transfer to muktainagar police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.